जावलीच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीर साथ द्या : आ.शिवेंद्रराजे

सातारा

मेढ्यात पदयात्रेद्वारे विराट शक्तिप्रदर्शन

सातारा,(प्रतिनिधी): सातारा- जावली मतदारसंघात आजवर झाली नाहीत एवढी विकासकामे गेल्या पाच वर्षात मार्गी लावली आहेत. जावली तालुक्याचा विकासात्मक कायापालट केला असून यापुढेही विकासकामांच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. ‘मुंह में राम और बगल मी छुरी’ अशा वृत्तीच्या विरोधकांपासून जनतेने सावध राहावे. मतदारसंघातील विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी सर्वांनी मला खंबीर साथ देऊन विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेढा नगरीत विराट संवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी आ. शिवेंद्रराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, विविध मान्यवर, आजी- माजी नगरसेवक, हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याने जावलीमध्ये विराट शक्तिप्रदर्शन झाले.

आ.शिवेंद्रराजेंनी मेढा नगरीत घर टू घर भेट दिली तसेच बाजारपेठेतही जाऊन दुकानदार, व्यावसायिक यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सर्वत्र आ. शिवेंद्रराजेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आ. शिवेंद्रराजेंनी सर्वांशी संवाद साधून विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. जो काम करतो त्याच्या पाठीशी जावलीतील जनता उभी राहते. आपल्या सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावरच हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. निवडणूकीपुरतं उगवलेल्या विरोधी उमेदवाराने आजवर तुमच्यासाठी काय केलं? उलट कोयना प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी मिळालेल्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालून त्यातून कमिशन खाल्ले. त्याचा वचपा काढण्याची चांगली संधी चालून आली आहे. जावलीकर कमिशन एजंटला घरी बसवून त्याला चांगला धडा शिकवतील याची मला खात्री आहे. सर्वांनी कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजेंनी केले.