सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम आ.शिवेंद्रराजेंनी केले : भाई वांगडे

सातारा

सातारा,(प्रतिनिधी): आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून परळी भागात विकासकामांचा डोंगर ऊभा राहिला आहे. परळी भागाचा कायापालट करणाऱ्या आ. शिवेंद्रराजेंनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. परळी पठारासह मुंबईस्थित परळी भागातील मतदार आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्य देऊन त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलतील, असा विश्वास शिवसह्याद्री परिवाराचे संस्थापक ज्ञानेश्वर उर्फ भाई वांगडे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परेल येथे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ परळी विभाग संघ मुंबई यांच्यावतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाई वांगडे बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, महेंद्रशेठ देवरे, किरण वांगडे, रुपेश आरगडे, प्रल्हाद साळुंखे, चंद्रकांत निकम (फौजी), अजित जाधव, शंकरशेठ देवरे, अशोक माने, भानुदास निकम,रविंद्र काटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंबईस्थित परळी खोऱ्यातील नागरिकांनी आ. शिवेंद्रराजेंचे जंगी स्वागत करून सर्वजण पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. परळी भागात विविध विकासकामे करतानाच येथील जनतेचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आगामी काळात परळी खोऱ्यात पर्यटनवाढीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणार असून परळीतील विकासपर्व कायम ठेवले जाईल. आपण सर्वांनी आशीर्वाद कायम पाठीशी ठेवावा आणि मला विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजेनी याप्रसंगी केले.