प्राचार्य बापूसाहेब उनउने स्मृत्यर्थ कर्मवीर विद्यापीठातर्फे साताऱ्यात आयोजन
सातारा,(प्रतिनिधी) : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने राष्ट्रीय मराठी व कोकणी भाषेतील बोलीभाषा खुल्या कविता लेखन स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धेसाठी मराठीच्या विविध बोली भाषेतून कोल्हापुरी, चंदगडी, मराठवाडी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मॉरिशस मराठी, झाडीबोली, तंजावरी मराठी, बागलाणी, नंदुरबारी, डोंगरागी, जामनेरी, खान्देशी,अहिराणी, माणदेशी, आदिवासी भाषा, तसेच कोकणी या स्वतंत्र भाषेतील विविध बोली भाषेतील कवितांचा या स्पर्धेत समावेश करण्यात येईल. या निमित्ताने स्पर्धकांनी बोली भाषेतून कविता पाठवून द्याव्यात, असे आवाहन छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळांचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले आहे.
प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मराठी बोली भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात असल्याचे सांगून प्रा. डॉ. सुभाष वाघमारे पुढे म्हणाले की, या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा आणि महाराष्ट्राचे सीमेवर असलेल्या राज्यातील मराठी भाषिक तसेच भारतात व भारताबाहेर असलेले मराठीचे तसेच कोकणी भाषेच्या विविध बोलीत लिहिणारे कवी सहभागी होऊ शकतील. कवितेच्या कोणत्याही प्रकारात बोली भाषेतून कविता लेखन करता येईल. कवितेची शब्दमर्यादा १०० ते १५० शब्द इतकी असेल. कवितेस विषयाचे बंधन नाही.एक कवी एक अथवा अनेक कविता पाठवू शकेल, प्रत्येक कवितेसाठी रुपये १०० /- इतके नोंदणी शुल्क पाठवणे आवश्यक राहील.आलेल्या सर्व बोली भाषेतील कवितांचा स्पर्धेत समावेश केला जाईल.
प्रमाणभाषेत कविता न पाठवता बोली भाषेतच कविता पाठवणे आवश्यक आहे.स्पर्धेसाठी आलेल्या मराठी बोलीतील कवितांचे परीक्षक यांचेकडून मूल्यमापन केले जाईल. परीक्षक यांनी दिलेला निकाल अंतिम मानला जाईल.बोलीभाषेतून लिहिलेल्या व परीक्षकांनी अधिक गुण देऊन उत्कृष्ट ठरविलेल्या पहिल्या तीन कवितांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास रु.५००० /- द्वितीय क्रमांकास ४००० रुपये व ,तृतीय क्रमांकास ३००० रुपये असे पारितोषिक असेल. तसेच उत्तेजनार्थ दहा पारितोषिके असून परीक्षकांनी ठरविलेल्या १० कवितांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषिक देण्यात येईल. या सर्व पारितोषिक विजेत्या कवींचा पारितोषिक वितरण समारंभात प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. या खेरीज स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक कवीच्या एका कवितेची निवड करून एक प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात येईल.
या कविता संग्रहात कोणती कविता प्रकाशित करावयाची याचे अधिकार संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांना असतील.कवींनी आपल्या कविता स्व हस्ताक्षरात लिहून पाठवून द्याव्यात तसेच आपल्या कविता स्व रचित असल्याचे प्रतिज्ञापत्र कवितेसोबत पाठवणे आवश्यक आहे. तसेच पोस्टाने पाठविणाऱ्या कविता देखील मराठी कोकिळा लिपीत टाईप करुन ती प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे मोबाईल नंबर ९८९०७२६४४० या व्हॉटस् अप क्रमांकावर पाठवून द्याव्यात. कवितेची स्व हस्ताक्षरातील प्रत प्रा.डॉ.सुभाष वाघमारे मराठी विभाग प्रमुख,छ.शिवाजी कॉलेज,सातारा ४१५००१ या पत्त्यावर पोस्टाने अगर कुरियरने २० नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत पोहचेल अशी पाठवून द्यावी.
एका कवितेसाठी फक्त रुपये १०० /- इतके प्रवेश शुल्क ९८९०७२६४४० या मोबाईल नंबरवर फोन पे, किंवा गुगल पे द्वारा पाठवून द्यावेत. डिसेंबर महिन्यात निकाल जाहीर करून पारितोषिक वितरण समारंभ आयोजन करण्यात येईल. यावेळी सहभागी प्रत्येक कवीस एक प्रातिनिधिक कवितासंग्रह भेट दिला जाईल.सहभागी सर्व कवींना स्पर्धेत सहभागी झाल्याचे एक प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी महाराष्ट्र तसेच अन्य अन्य राज्यातील मराठी कोकणी भाषिक कवी यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.