“भय इथले संपत नाही..” : मोठी खळबळ, मारेकरी मोकाट
पुणे,(प्रतिनिधी) : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे पूर्ववैमनस्यातून कोयता व तलवारीने चुलत भावांसह काका, काकीने केलेल्या हल्ल्यात कैलास रखमाजी हागारे (वय ४०) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याच्यावर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मारेकरी मोकाट फिरत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाची उदासीनता दिसत असून खुलेआम दिवसा ढवळ्या होणाऱ्या तलवार हल्ल्यामुळे “भय इथले संपत नाही..” अशीच दौंड तालुक्यातील परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवरात्रोत्सवात झालेल्या यात्रेवेळी देवीची पालखी नेण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादावादीचे पर्यावसन गंभीर हल्ल्यात झाल्याने दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. कैलास हागारे ही व्यक्ती शेतात काम करत असताना त्याचे चुलते सोमनाथ दगडू हागारे, चुलती सौ नंदा हागारे व प्रवीण आणि गणेश या चुलत भावांनी त्याच्यावर कोयता व तलवारीने वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे.
सदर तरुणाला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहे. जखमी तरुणाचा डोक्यावर पायावर गंभीर खोलवर जखमा झाल्या असलेने जखमी तरुणावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार केले जात आहे. या मारामारी प्रकरणातील मारेकरी मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. हल्लेखोरांना तातडीने ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणीही होत आहे.