कृष्णा फाउंडेशनच्या कर्मचाऱ्याने पैसे वाटप केल्याचे केले कबूल

कराड

अतुल भोसले यांना मते देण्यासाठी लालूच दाखवण्याचा प्रकार कोळेवाडीत उघडकीस

कराड, (प्रतिनिधी) : मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपये वाटून कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांना मत देण्यासाठी लालूच दाखवण्याचा प्रकार कोळेवाडी (ता. कराड) येथे उघडकीस आला असून याप्रकरणी कृष्णा फाउंडेशन, वाठार येथील एक कर्मचारी गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडला आहे.

याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील माहितीनुसार, कोळेवाडी, ता. कराड येथे एका युवकास ग्रामस्थांनी मतांसाठी पैसे वाटत असताना रंगेहाथ पकडले असून, त्याने अतुल भोसले यांना मते देण्यासाठी आपण मतदारांना पैसे वाटल्याचे कबूल केले आहे. याबाबत हिम्मतराव जाधव व इतरांची नावेही संबंधित व्यक्ती घेत असून किमान १०० मतदारांना प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे मतांसाठी पैसे वाटल्याचे त्याने जागृत नागरिकांनी पकडल्यावर सांगितले आहे. त्याच्याकडे मतदारांची यादी व रोकडही दिसून आली आहे. काही जागृत नागरिकांनी त्याच्या जबाबाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

दरम्यान या प्रकारामुळे कराड दक्षिण मतदार संघात मोठी खळबळ निर्माण झाली असून महायुतीच्या उमेदवाराच्या वतीने त्यांच्या संचालनाखाली कार्यरत असलेल्या फाउंडेशनच्या कर्मचाऱ्याने दिलेला कबुली जबाब मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या वतीने कोणीही काहीही खुलासा केल्याचे दिसून येत नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. निवडणूक आयोगाच्या एक खिडकी विभागाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंत सुरू होती.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा कराडचे प्रांताधिकारी श्री. म्हेत्रे यांच्याशी संपर्क होत नसला तरी, संबंधित व्हिडिओमध्ये पैसे वाटताना रंगेहाथ पकडलेल्या युवकाकडून या प्रकाराची माहिती घेत असलेल्या व्यक्ती कोळेवाडी येथील असून त्यामध्ये कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख हे दिसून येत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधला असता व्हिडिओची सत्यता पडताळून उद्या याविषयी माहिती सांगू असे त्यांनी म्हटले आहे.