खा.उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात घणाघाती टीका; गांधी मैदानावर प्रचाराची सांगता सभा उत्साहात
सातारा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे वयाने व राजकारणामध्ये अनुभवाने ज्येष्ठ आहेत, मात्र वाई येथील सभेत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गद्दार हा शब्द वापरणे चुकीचे आहे. राज्यात महायुतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत, मात्र यापूर्वी साठ वर्षे सत्ताधाऱ्यांना या योजना दिसल्या कशा नाहीत?, अशी जळजळीत टीका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली.
साताऱ्यातील गांधी मैदानावर महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त आयोजित प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते, यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, विठ्ठल बलशेटवार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, लोकसभा संयोजक सुनील काटकर, अमोल मोहिते, अशोक मोने, ॲड. दत्ता बनकर, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर तसेच सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रचार सभेत उपस्थितांना आवाहन करताना श्री. छ. उदयनराजे पुढे म्हणाले की, सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. येथे अनेक चळवळी उदयाला आल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे व मला राजघराण्याचा वारसा लाभला आहे. तसेच आपण मतदारांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आम्ही दोघेही लोकप्रतिनिधी म्हणून आपली सेवा करण्यास कटीबद्ध आहोत. सद्यस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे प्रचारात ठोसपणे बोलण्यासारखं काहीच नाही. महायुतीच्या जनविकासाभिमुख कारभाराने त्यांना बोलण्यासाठी काही शब्दच ठेवला नाही. विरोधकांचे ध्येय फक्त अफवा पसरवून सत्ता हस्तगत करणे इतकेच आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी वाई येथील सभेत गद्दारांना पाडा, असे आवाहन केले होते. हा शब्द त्यांनी कोणत्या आधारे वापरला? असे शब्द वापरणे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली.गेल्या साठ वर्षात ज्यांनी बोल थापा मारल्या, त्यांना तुतारी मिळाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले. ते आता हातात मशाल घेऊन त्याच्या उजेडात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेली विकास कामे शोधत आहेत. “महायुतीला लागली कडकी, म्हणून आणली योजना बहीण लाडकी” असले बोलणे योग्य आहे का? स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच असले उद्गार महाविकास आघाडीचे नेते काढत आहेत. त्यांनी जो जाहीरनामा काढला आहे तो महायुतीने या आदीच पूर्ण केलेला आहे. सातारा- जावली मतदारसंघातून शिवेंद्रराजेंचा विजय ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. तसेच जावली ही सुद्धा ऐतिहासिक भूमी आहे. दोन्ही तालुक्यांच्या या मतदारसंघात काम करताना माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. आज या सभेला लाडक्या बहिणी एकट्या आल्या असल्या तरी, घरातील चार मते सोबत घेऊन आलेल्या आहेत. माझ्या विजयाच्या खऱ्या अर्थाने त्या शिल्पकार ठरत आहेत. परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेले हे ठिकाण असून पूर्वजांनी घालून दिलेला वारसा जपण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. सातारा हा भाजपचा बालेकिल्ला बनवा, आता सर्वांच्या माध्यमातून विजयाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात विकासाची उत्तुंगता तुम्हाला दिसून येईल.
माझ्या दृष्टीने मंत्रीपद महत्त्वाचे नाही, मंत्रीपदापेक्षाही चांगली कामे केलेली आहेत.सातारकर हा केंद्रबिंदू म्हणूनच मी काम करणार आहे. या पुढील काळातही सतत मी आपल्या बरोबर असणार आहे. सातारा आणि जावळी या दोन्ही तालुक्यात पर्यटन वाढीसाठी नवीन महाबळेश्वर योजना प्रकल्प सुरू आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक साताऱ्यात आले पाहिजेत, तसेच येथे व्यवसाय वृद्धी होऊन लहान मोठ्या व्यवसायिकांचा फायदा झाला पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. आज माझ्यासोबत तरुणाईची शक्ती दिसत आहे, कारण त्यांना दिलेला वेळ आणि प्रेम यामुळे आमचे अनोखे नाते निर्माण झाले आहे. दि.२३ नोव्हेंबर रोजी अशीच जोरदार सभा होईल आणि ती विजयाच्या गुलालाची असेल याची सर्वांनाच खात्री आहे. पूर्वी उदयनराजे आणि माझ्यात संघर्ष होता, पण देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बसून आम्ही ते वाद मिटवले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी ताकद असून, त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विकास निधी येत आहे, त्यामुळे येत्या वीस तारखेला महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
राज्यात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या
आमच्या दोघांमधील संघर्ष संपला आहे, अशी ग्वाही देत साताऱ्याच्या विकासात आम्ही कोठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन दोन्ही महाराजांनी दिल्यानंतर गांधी मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ” कभी झुकेगा नही”या पुष्पा चित्रपटातील डायलॉगप्रमाणे आम्ही दोघेही अन्यायाच्या पुढे कधीच झुकणार नाही. त्यामुळे बाबाराजेंना आता राज्यात प्रथम क्रमांकाच्या मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा, असे आवाहनही श्री. छ. उदयनराजे यांनी यावेळी केले.