खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन
सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आहे. भारतीय जनता पक्ष व महायुतीतील पक्षांनी शिवरायांचे विचार आचरणात आणले, त्यामुळेच मतदारांनी आम्हाला मोठा प्रतिसाद दिला व राज्यात महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. छ. उदयनराजे म्हणाले की, या निवडणुकीत जनतेने सकारात्मक वाटचाल करणाऱ्या व समाजाची प्रगती करणाऱ्या नेतृत्वांना मते दिली. नकारात्मक दिशेने विचार करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने झुगारून टाकले आणि आता इथून पुढे कधीच त्यांना स्वीकारणार नाही, हेच या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध केले आहे. यापुढे विरोधकांनी राजकारण विसरून जावे हेच जनतेच्या कौलातून दिसून येते.
सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यानेच महायुतीला पोषक असा हा निकाल लागला आहे. लोकशाहीतील खरे राजे असलेल्या मतदारांनी घेतलेला हा निर्णय राज्याला आणखीन विकासापर्यंत नेईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. विरोधकांनी केलेल्या करणीचे त्यांना फळ मिळाले आहे, असे सांगून ‘जैसी करणी, वैसी भरणी,’ हेच या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असे सांगून शिवेंद्रराजेंना मंत्रीपद मिळाल्यात जमा आहे, अशी खात्रीही उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केली.
आ.शिवेंद्रराजेंनी घेतले जलमंदिरात दर्शन
निवडणुकीतील यशानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले कार्यकर्त्यांसमवेत खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी गेले. व तेथे त्यांनी देवघरात श्री भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीतील प्रचंड मताधिक्याबद्दल पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले.
उदयनराजेंच्या नेतृत्वाखालील जिल्ह्याची नवी सुरुवात : आ.शिवेंद्रसिंहराजे
जलमंदिर पॅलेस येथे भेट दिल्यावर, पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, खा. श्री. छ. उदयनराजेंच्या खासदारकीच्या यशाने जिल्ह्यातील भाजपाच्या विजयाची मध्यंतरी सुरुवात झाली. विधानसभेतील निर्विवाद विजयाने यशाचे पुढले उत्तुंग पाऊल उचलले गेले आहे. जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच उमेदवार काठावर नव्हे तर मोठ्या फरकाने निवडून आले आहेत, ही उदयनराजेंच्या नेतृत्वाखालील जिल्ह्याची नवी सुरुवात आहे. सातारा शहर व तालुका आणि जावली तालुक्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली काम करेन, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.