जिल्ह्यातील आठही मतदार संघात महायुतीचा डंका; पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण या आमदारांना पराभवाचा धक्का
सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा – जावली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले १ लाख ४२ हजार १२४ इतक्या मताधिक्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमित कदम यांच्यावर मात करून पाचव्यांदा विधानसभेत दाखल झाले आहेत. हे मताधिक्य राज्यात प्रथम क्रमांकाचे असून या विजयाचे श्रेय वडीलबंधू खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि मतदार बंधू-भगिनींना देत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले असून कराड दक्षिण आणि कराड उत्तर या मतदारसंघातून दोन्ही माजी मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. एकंदरीत आजच्या निकालातून सातारा जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा धक्कादायक पराभव करत कराड दक्षिण व कराड उत्तर या मतदारसंघातून अनुक्रमे डॉ.अतुल भोसले व मनोज घोरपडे यांनी अर्धशतकापासूनच्या सत्ता केंद्रांना धक्का दिला आहे.
फलटण राखीव मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे उमेदवार दीपक चव्हाण यांचे चौथ्यांदा विधानसभेत जाण्याचे स्वप्न भंग पावले असून तेथे सचिन पाटील या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मावळत्या आमदारांना धोबीपछाड केले आहे.
पाटण या बहुचर्चित हेवी वेट मतदार संघात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या धनुष्यबाणातून विरोधकांवर निशाणा साधला व डोंगरदर्यावर आपलेच राज्य असल्याचे सिद्ध केले.
कोरेगाव मतदार संघात शिवसेनेचे महेश शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेसाठी शशिकांत शिंदे यांना पराभूत केले. यापूर्वी लोकसभा आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती.आजच्या निकालाने त्यांना सलग चौथ्यांदा पराभवाची नामुष्की सहन करावी लागली.
माण- खटाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोरे यांनी सलग चौथ्यांदा आमदारकीचा मान मिळवला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांचा त्यांनी सुमारे अर्ध्या लाखाने पराभव केला.
वाई- खंडाळा- महाबळेश्वर या संपूर्ण राज्यातील क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटील यांच्या घड्याळाची सलग चौथ्यांदा टिकटिक वाजली आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव केला. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनाही विधानसभेसाठी तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला.
जिल्ह्यातून तीन नवे आमदार विधानसभेत
या निवडणुकीतून डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे आणि सचिन पाटील हे तीन नवे चेहरे जिल्ह्यातून विधानसभेत दाखल झाले आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील या दोन माजी मंत्र्यांसह, तीन वेळा आमदारकी भूषवलेले दीपक चव्हाण यांना जनतेने नाकारले आहे. यानिमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि सहकार क्षेत्रात नावाजलेले बाळासाहेब पाटील व अभ्यासू नेतृत्व असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
आ.शिवेंद्रराजेंच्या विजयाची पंचपदी
साताऱ्यात निकाल जाहीर होताच सातारा शहरासह सातारा व जावली तालुक्यात शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला असून विजयाची पंचपदी संपादन करणार याची खात्री असल्याने दोन दिवसांपासून अभिनंदन असे फलक ठिकठिकाणी लावण्यात येत होते.शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पाचव्यांदा राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून जात असून सलग दुसऱ्यांदा भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. त्यांचे वडील (कै.) अभयसिंहराजे भोसले यांनी १९७७ पासून सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.आमदारकीबरोबरच, लोकसभा सदस्य आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीचा महाएल्गार निर्माण झाल्याने तसेच राज्यात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळाल्याने शिवेंद्रसिंहराजे यांचे मंत्रिपद निश्चित असल्याची चर्चा राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे.