छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये विद्यार्थी -पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

सातारा

सातारा,(प्रतिनिधी): सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये इ.बारावी विद्यार्थी -पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला.

पालक मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा.दशरथ जाधव यांनी केले.प्रास्ताविकात पालक मेळावा आयोजित करण्याचा उद्देश सांगितला तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक प्रयत्न करतात तसेच पालकांनी आपल्या पाल्याकडे वेळ व लक्ष द्यावे असे सांगितले.रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य बोर्डाचे सचिव प्रा.संदीप भुजबळ यांनी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासामध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका विशद केली.पालकांनी महाविद्यालयात येऊन पाल्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा असे सांगितले.ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.गणेश पाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम त्यामध्ये विषय तज्ञाची मार्गदर्शनपर व्याख्याने,सराव परीक्षा, प्रगत-अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,तसेच बारावी सराव परीक्षा, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा, बोर्ड लेखी परीक्षेतील यावर्षी झालेले बदल, बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना करावयाची तयारी, याबद्दल माहिती दिली.

पालकांच्या मनोगतात श्री.भरत एकनाथ मोझर यांनी पालक मेळावा हा चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगले यश मिळवावे असे विचार मांडले.लोहार मॅडम, सत्वशीला काळे मॅडम यांनीही पालक मनोगते व्यक्त केली.

पालक मेळाव्याचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाची असणारी बोर्ड परीक्षा तसेच महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा असून ती पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगितले.चांगला अभ्यास करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असे विचार मांडले.

कार्यक्रमाचे आभार ज्युनिअर कॉलेज विभागातील पर्यवेक्षिका प्रा.आसावरी शिंदे मॅडम यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा. डॉ.तायराश गुप्ता बागवान यांनी केले.

या पालक मेळाव्याला ज्युनिअर व व्यवसाय शिक्षण विभागातील सर्व शिक्षक,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.