खा.शरदरावजी पवार यांच्या हस्ते दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी उद्घाटन
सातारा,(प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेली रयत शिक्षण संस्था, सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध मराठी मनाचा २०२५’ हे सूत्र घेऊन २० वे जागतिक मराठी संमेलन दिनांक १०, ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते खा. शरदरावजी पवार हे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ.ह. साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले, सन १९८९ मध्ये जागतिक मराठी परिषद या संस्थेची स्थापना झाली. जागतिक पातळीवर मराठी भाषिकांना एकत्र आणावे, मराठी भाषा, संस्कृती याची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी. उद्योग, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात मराठी माणसाने प्रगती साधण्याकरता त्याला उद्युक्त करावे. विचारांची देवाण-घेवाण व्हावी अशा उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली आहे. या परिषदेचे संस्थापक अध्यक्षपद मा. शरदरावजी पवार, मा. मनोहर जोशी, भा. कृ. देसाई आणि श्री. माधव गडकरी यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असणाऱ्या व्यक्तींनी भूषविले आहे.
जागतिक मराठी परिषदेचे पहिले अधिवेशन ऑगस्ट १९८९ मध्ये मुंबई या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावर्षी जागतिक मराठी परिषद आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०, ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी सातारा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या, छत्रपती शिवाजी कॉलेज परिसरात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये किमान ३००० ते ३५०० विद्यार्थी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले अभ्यासक नागरिक सहभागी होणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. शरदरावजी पवार व या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. यावेळी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण करणारे बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष मा. हनुमंतराव गायकवाड यांना “जागतिक मराठी भूषण” २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक मा. राजीव खांडेकर यांना विवा चारिटेबल ट्रस्ट पुरस्कृत जागतिक मराठी गौरव पुरस्कार मा. खा. शरदरावजी पवारसाहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम रुपये २५,००० सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या जागतिक मराठी परिषदेमध्ये उद्योग, साहित्य, कला, संस्कृती आरोग्य, क्रीडा, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याने आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. अशा व्यक्तींच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजातील नव्या पिढीने आणि तरुण वर्गाने प्रेरणा घ्यावी आणि आपल्या कार्याची दिशा निश्चित करावी या उद्देशाने अशा मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या अभ्यासू व्यक्तींच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. याशिवाय शिल्पकला, चित्रकला अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या कलात्मकतेचा अविष्कार ही या निमित्ताने केला जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या जागतिक मराठी परिषदेच्या माध्यमातून अनेक तरुणांना उद्योगाच्या शिक्षण क्षेत्रातील विविध संधीच्या त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील असणाऱ्या विविध संधी आणि या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या नव्या दिशा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष कविवर्य रामदास फुटाणे आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच या संमेलनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राच्या समाज जीवनात सर्वसामान्य माणसांचे वैचारिक मशागत करण्याचे काम अखंडपणे आयुष्यभर केले ते ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक, मा. डॉ. आ. ह. साळुंखे हे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाची वैचारिक पर्वणी या निमित्ताने संमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, नागरिक आणि अभ्यासकांना होणार आहे. तरी या संमेलनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिकांनी उपस्थित रहावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या संमेलनाचा आपल्या भविष्य घडवण्यासाठी उपस्थित राहून त्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री. रामदास फुटाणे आणि स्वागत अध्यक्ष श्री. चंद्रकांत दळवी यांनी केले आहे.