सद्गुरु श्री.वामनराव पै यांच्या उपस्थितीतील साताऱ्यातील कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा
सातारा,(प्रतिनिधी) : जीवन विद्या मिशनतर्फे साताऱ्यातील हजेरीमाळ मैदानावर ८ डिसेंबर १९९९ रोजी सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य असा ‘न भूतो न भविष्यती’ सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात झाला होता. त्यास २५ वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी रौप्य महोत्सवी कृतज्ञता आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जीवन विद्या मिशनचे विश्वस्त व कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक चंद्रशेखर चोरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारच्या सोहळ्यामध्ये जीवन विद्या मिशनमध्ये गेली २५ वर्ष कार्य करणाऱ्या नामधारकांच्या मनोगतातून विविध अनुभवांची शिदोरी ऐकावयास मिळणार आहे. तसेच या रौप्य महोत्सवात हरिपाठ, नामसंकीर्तन यज्ञही होणार आहे. तसेच या कार्यक्रमास मुंबई येथील कलाकारांची साथ लाभणार आहे.
जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कर्ष व उन्नतीसाठी सातत्याने सक्रिय असणारी संस्था आहे. संपूर्ण जग सुखी व्हावे, भारत सर्वार्थाने अन्य राष्ट्रांच्या पुढे जावे आणि ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या सिद्धांताभोवती जीवन विद्येचे तत्त्वज्ञान फिरत आहे.सद्गुरू वामनराव पै हे १९५५ सालापासून या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. सद्गुरु वामनराव पै यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आदरणीय प्रल्हाददादा पै हे भारत देशासह जगभरात कार्य पसरवत आहेत.
दरम्यान , सातारा येथील हजेरीमाळ मैदानावर २५ वर्षापुर्वी म्हणजेच ८ डिसेंबर १९९९ रोजी सद्गुरु वामनराव पै यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य असा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. या महोत्सवाला हजारो नामधारक उपस्थित होते. रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी सातारा जिल्हा परिषदेसमोरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हॉलमध्ये सायंकाळी ४ ते ८ या वेळेत रौप्य महोत्सवाची ‘२५ वर्षे कृतज्ञतेची’ हा आनंद सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यामध्ये जीवन विद्या मिशनमध्ये गेली २५ वर्ष कार्य करणाऱ्या नामधारकांच्या मनोगतातून अनुभव अनुभवयास मिळणार आहेत.
जीवन विद्या मिशनच्या सातारा, वाई व कोरेगाव शाखेच्या वतीने आयोजित या महोत्सवाला जिल्ह्यातून हजारो नामधारक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा शाखेच्या अध्यक्ष संगीता शिराळे, वाई शाखेच्या अध्यक्ष स्वाती मांढरे व कोरेगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. विधाते यांनी केले आहे.