“पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है…”

सातारा

सातारकर जागृत नागरिकांचे पोवई नाक्यावर कृतिशील आंदोलन

सातारा,(प्रतिनिधी): “पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है” असे फलक हातात नाचवत पर्यावरणप्रेमी व संवेदनशील सातारकरांनी पोवई नाक्यावर कृतिशील आंदोलन केले. या नागरिकांनी पोवई नाका ते साईबाबा मंदिर दरम्यान रस्ता दुभाजकामधील पाण्याअभावी सुकून गेलेल्या झाडांना पाणी घालत त्यांना नवसंजीवनी प्राप्त करून दिली.

सातारा शहरातील पोवई नाका ते गोडोली साईबाबा मंदिर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या रस्त्यावरील दुभाजकामध्ये सुशोभीकरणासाठी मोठी झाडे लावण्यात आली आहेत. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर हिट आणि त्यानंतर वाढती उन्हाची तिरीप यामुळे झाडे सुकून चालली होती. यातील तीन – चार झाडे पूर्णपणे वाळून गेली होती.सार्वजनिक बांधकाम विभागाचे या झाडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन साताऱ्यातील हरित सातारा ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता दुभाजकामधील झाडांना स्वखर्चाने टँकरने पाणी घालत सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष वेधले.

हरित सातारा ग्रुपचे सुधीर विसापुरे या उपक्रमाबाबत बोलताना म्हणाले, खरंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुभाजकामधील झाडांच्या देखभालीचा ठेका दिला आहे. संबंधितांकडून या झाडांची वेळोवेळी देखभाल होते का नाही? हे पाहणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. कामाच्या गडबडीमध्ये कदाचित संबंधित अधिकाऱ्यांना आपणच लावलेल्या झाडांचा विसर पडला असावा. त्याची त्यांना आठवण करून देण्यासाठी आणि झाड वठून त्याचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही स्वखर्चाने या झाडांना आज टँकरने पाणी घातले. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ हाच रस्ता दुभाजक नव्हे तर इतरही सर्व दुभाजकांमधील झाडांना वेळोवेळी पाणी घालून त्यांची देखभाल करावी.

या उपक्रमासाठी निलेश कुमठेकर यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. ‘हरित सातारा’चे कन्हैयालाल राजपुरोहित, शैलेंद्र पाटील, भालचंद्र गोताड, उमेश खंडूजोडे, दशरथ रणदिवे, निखील घोरपडे, अमोल कोडक, दत्तात्रय चाळके, किरण कदम, संजय झेपले, राजेश पुराणिक आणि वृक्षप्रेमींनी कृतीशील सहभाग घेतला.

दरम्यान, लावलेल्या रोपांना पाणी देता येत नसेल तर यासारखी दुर्दैवी बाब नाही. आपणसुद्धा निसर्गाचे देणे लागतो, हे लक्षात घेऊन प्रत्येकानेच पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे भालचंद्र गोताड यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.