दि.१४ व १५ डिसेंबर रोजी भोर येथे संमेलनाचे आयोजन
सातारा,(प्रतिनिधी) : अंगापूर (ता. सातारा) येथील प्रा.डॉ. शरद गायकवाड यांची भोर (जि. पुणे) येथे होणाऱ्या दहाव्या राज्यस्तरीय फुले, शाहू, आंबेडकर विचार- प्रसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती आयोजक डॉ. रोहिदास जाधव यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रा.डाॅ.शरद गायकवाड हे कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात मराठी अधिविभागात कार्यरत आहेत. तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून गेली चार दशकांपासून ते महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. वाटेगाव येथील अण्णा भाऊ साठे स्मारक प्रश्नी त्यांनी केलेले आंदोलन विशेष उल्लेखनीय आहे. पोतराजांचे जटा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान, जातीअंत चळवळ, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, संविधान जागृती यासंबंधी गेली चार दशके ते महाराष्ट्रभर प्रबोधनात्मक व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करीत आहेत.नामांतर चळवळीबरोबरच दलितांच्यावर होणाऱ्या अन्याय ,अत्याचाराच्या विरुद्ध आंदोलन, मोर्चे, उपोषण, घेराव, निदर्शने त्यांनी केलेली आहेत.
डॉ शरद गायकवाड हे महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर तज्ञ सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रकाशन संस्था (बार्टी), पुणे यांच्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथ प्रकाशन समितीवर देखील तज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ गायकवाड यांनी यापूर्वी राज्यपाल व मुख्यमंत्री नियुक्त तज्ञ सदस्य म्हणून शासनाच्या लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगावर देखील कार्य केलेले आहे.
भोर येथे दि. १४ व १५ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन नवी दिल्ली येथील खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, ज्येष्ठ साहित्यिक व संपादक उत्तम कांबळे उपस्थित राहणार आहेत.
कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ .श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे, लहू कानडे, डॉ.रावसाहेब कसबे, हरी नरके, डॉ. सुखदेव थोरात, रजिया पटेल, खा. श्रीनिवास पाटील यांसारख्या मान्यवरांनी यापूर्वी झालेल्या या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषवलेली आहेत.
या संमेलनात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील यांना “राजर्षी छत्रपती शाहू महाराज पिलर ऑफ एज्युकेशन” या विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.