आ.शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

सातारा

सातारा – जावलीसह जिल्ह्यात शिवेंद्रराजे प्रेमींचा जल्लोष

सातारा ,(प्रतिनिधी): “मी शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, ईश्वरसाक्ष मंत्रीपदाची शपथ घेतो की….” हे शब्द उपराजधानी नागपूरमधील विधान भवनाच्या प्रांगणातील ध्वनीक्षेपकातून घुमले आणि स्वराज्याची राजधानी साताऱ्यासह संपूर्ण जिल्ह्यातून समाधानाची लकेर उमटली.

सातारा -जावली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांकाचे मताधिक्य घेतलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीपद मिळणार हे निश्चितच होते. भारतीय जनता पक्षातर्फे सलग दुसऱ्यांदा आणि साताऱ्यातून पाचव्यांदा विधानसभेत दाखल झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दिवंगत सहकार मंत्री व सातारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार (कै.)अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र. शिवछत्रपतींच्या राजघराण्याचा समृद्ध वारसा आणि वडिलांच्या समाजकारण व राजकारणाची पार्श्वभूमी असल्याने सुरुवातीपासूनच सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होते.

सन २००४ मध्ये वडिलांच्या आकस्मित निधनानंतर सक्रिय राजकारणात आले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस व त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. तळागाळातील कार्यकर्त्यापासून पक्ष, संघटनेतील वरिष्ठांपर्यंत सर्वांशीच त्यांचा उत्तम स्नेह आहे. कोणतीही परिस्थिती कशी हाताळावी याचे प्रसंगावधान ही त्यांना आहे. त्यामुळेच संयमी नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक लाख ४२ हजार १२४ इतके विक्रमी मताधिक्य मिळवून ते राज्यात द्वितीय क्रमांकाने निवडून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार त्यांचे मंत्रिपद निश्चितच होते. मात्र विक्रमी मताधिक्यामुळे त्यावर शिक्कामोर्तबही झाले होते. मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या शपथविधी प्रसंगी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना शपथ देण्यात आली आणि जिल्हावासियांची बाबाराजेंच्या मंत्रिपदाची अपेक्षा फलश्रुतीस आली.

पक्षनिष्ठा आणि कामाची धडाडी लक्षात घेता पिताश्री (कै.) अभयसिंहराजे भोसले यांच्याप्रमाणे त्यांनाही सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली जाईल, अशी खात्रीही राजकीय जाणकारांसह बाबाराजे यांच्या समर्थकांतून व्यक्त होत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शपथविधीचे दृश्य टीव्ही व सोशल मीडियावर पाहताच सातारा शहरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीतील यशाप्रमाणेच मंत्रीपदाचीही खात्री असल्याने प्रत्यक्ष शपथविधी अगोदरपासूनच शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी फ्लेक्सद्वारे त्यांच्या अभिनंदनाचे फलक लावून जल्लोष केला होता. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर साताऱ्यात आगमन करतील त्यावेळी मोठ्या आनंदात पुन्हा एकदा दिवाळीच साजरी करणार असल्याचे त्यांच्या अनेक समर्थकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.