हॉटेल ‘गुलबहार’ २९ लाखाच्या थकबाकीसाठी पालिकेकडून सील

सातारा

सातारा पालिकेचा दणका ; अंशतः रक्कम भरल्याने कारवाई शिथिल

सातारा,(प्रतिनिधी) : थकीत करवसुलीच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या वसुली विभागाने कारवाई गतिमान केली आहे. २९ लाख रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी पोवई नाक्यावरील सुप्रसिद्ध गुलबहार हॉटेल बुधवारी वसुली विभागाचे कर अधिकारी उमेश महादर यांनी सील केले. या कारवाईने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. सात दिवसाच्या मुदतीला प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. तर अंशतः रक्कम भरल्याने आणि अन्य थकबाकीपोटी धनादेश दिल्याने दोन तासातच या हॉटेलचे सील काढण्यात आले.

सातारा नगरपालिकेने वर्षानुवर्षे कर थकवून पालिकेच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात कारवाईचे हत्यार उपसले आहे. पालिकेच्या वसुली विभागाने अशा व्यवसायिकांची यादी तयार केली असून त्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध उद्योजक सुधाकर शानभाग यांना एक डिसेंबर रोजी गुलबहार हॉटेलची थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. त्याकरिता त्यांना सात दिवसाची मुदतही देण्यात आली होती, मात्र या मुदतीत त्यांच्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे २९ लाख ३३ हजार ६३८ एवढी थकबाकी भरण्यात दिरंगाई केल्याने बुधवारी सकाळी पालिकेच्या वसुली विभागाने गुलबहार हॉटेलच्या प्रवेशद्वाराला सील ठोकले.

सातारा पालिकेचे वसुली विभाग प्रमुख उमेश महादर, भाग लिपिक राजाभाऊ कराड, मिलिंद सहस्रबुद्धे, जगदीश मुळे, गणेश पवार, रवींद्र भाग्यवंत, तुषार माहुलकर, तेजस कांबळे, पियुष यादव ,अशोक वायदंडे, राहुल आवळे, प्रभाकर वागडोळे, तेजस साखरे यांनी या कारवाईत भाग घेतला. दरम्यान थकीत कराच्या वसुलीपोटी पालिकेतर्फे अशाच पद्धतीने कारवाईचा सिलसिला सुरू राहणार असून शंभर टक्के वसुली करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे उमेश महादर यांनी सांगितले.

दरम्यान, संबंधित हॉटेल मालकांनी थकबाकीपोटी दोन लाख रुपयांचा अंशतः रोख भरणा करून आणि उर्वरित रकमेसाठी पुढील तारखांचे तीन धनादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अवघ्या दोन तासातच सदरहू हॉटेलचे सील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले.

धनादेश न वटल्यास फौजदारी कारवाई : अभिजित बापट

दरम्यान संबंधित मिळकतदाराने थकीत करापोटी दोन लाखाची रोख रक्कम आणि पुढील तारखांचे तीन धनादेश दिले असून संबंधित धनादेश न वाटल्यास चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली आहे.