मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे जिल्ह्यात जल्लोषी स्वागत

सातारा

फ्लेक्स, विद्युत रोषणाई, पेढे तुला व हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसह साताऱ्यात आनंदोत्सव

सातारा,(प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रीपदाची घोषणा झाल्यावर प्रथमच जिल्ह्यात आगमनकर्ते झालेल्या ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फ्लेक्स, विद्युत रोषणाई, पेढे तुला, जेसीबीमधून व हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसह साताऱ्यात अक्षरशः आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळाल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळणार हे निश्चितच होते. सलग पाचव्यांदा विधानसभेत जाण्याची संधी त्यांना मिळाली असून शिवछत्रपतींचा वारसा आणि कमालीची लोकप्रियता असणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे. गेल्या आठवड्यात नागपूर विधानभवनात त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.त्यानंतर सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.अधिवेशनामध्ये व्यस्त असल्याने आज (रविवार) ते मतदारसंघात व जिल्ह्यात आले.पुणे येथील विमानतळापासूनच त्यांच्या स्वागताचा जल्लोष त्यांच्या समर्थकांनी केला.

जिल्ह्याच्या हद्दीवर शिरवळ येथे सर्वप्रथम त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांच्या निनादात आणि जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे आणि स्वागताचे फलक लावण्यात आले होते. याशिवाय त्यांच्या समर्थकांनी मोबाईल स्टेटस व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अभिनंदनाच्या पोस्ट व्हायरल केल्या होत्या.दरम्यान, महामार्गावरील शिरवळ पासून सर्वच गावात ना. शिवेंद्रसिंहराजेंचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. जावली तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडीसह तालुक्यात कुडाळ, करहर येथेही कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. करहरमध्ये बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रीपदाबद्दल अभिनंदन करतानाच प्रथमच जिल्ह्यात आगमन झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ त्यांच्या काही समर्थकांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थ,अजिंक्यतारा साखर कारखाना, तसेच सुरुची निवासस्थानावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही केली.

जिल्ह्यात विकासकामांचा झंजावात निर्माण करणार : ना. शिवेंद्रसिंहराजे

मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर जिल्ह्यात प्रथमच आल्यावर नागरिकांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल समाधान व्यक्त करून पत्रकारांशी बोलताना ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतील भारताचा नवविकास प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिलेले मंत्रीपद खऱ्या अर्थाने साताऱ्याचा सन्मान आहे तसेच नागरिकांच्या विकासाचे नवे पर्व आहे.जिल्ह्यात महायुतीने एकूण चार कॅबिनेट मंत्रीपदे दिली असल्याने मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

सातारा मतदारसंघाला जवळपास तीन दशकांनी मंत्रीपद मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून राज्यात रस्ते, पूल व अन्य सर्व प्रकारच्या बांधकामांना प्राधान्य देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावणार आहोत.तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एशियन बँकेच्या माध्यमातून मोठा निधी उभा केला होता. त्याच धर्तीवर आम्ही काम करणार असून केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची आम्ही भेट घेतली आहे. पुणे – सातारा रस्त्याचे सहापदरीकरण या संदर्भात चर्चा करण्यात आली असून या रस्त्याच्या ठेकेदार कंपनीकडून हे काम काढून घेतले जाणार आहे. रिलायन्स इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे लवकरच या रस्त्यासाठी फेरनिविदा काढली जाणार असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले असून महामार्गाच्या सहापदरीकरणाचे कामे चांगल्या पद्धतीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ना. जयकुमार गोरे, ना. शंभूराज देसाई, ना. मकरंद पाटील या जिल्ह्यातील अन्य सहकारी मंत्र्यांसोबत जिल्ह्याला प्रगतीची नवी दिशा दाखवू. तसेच जिल्ह्यातील प्रश्न सुटायला आता काहीच हरकत नाही.

पाटणमध्ये अतिवृष्टी तर माण तालुक्यांमध्ये दुष्काळ, खंडाळा तालुक्यामध्ये पाणीटंचाई, साताऱ्यामध्ये सेवा अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था या सर्व प्रश्नांना आम्ही सर्व कॅबिनेट मंत्री म्हणून निश्चितच न्याय देऊन जिल्ह्यात विकासकामांचा झंजावात निर्माण करणार आहोत.

पालकमंत्रीपदासंदर्भात बोलताना ना.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ही मंत्रिपदाची माझी पहिलीच टर्म असून माझ्यावर जबाबदारी देण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याबाबत सध्या मी माहिती घेत आहे.मात्र पालकमंत्री पदाबाबत महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील. पक्षाच्या माध्यमातून मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी पार पाडेन.