तुफान आतषबाजी, भलेमोठे पुष्पहार, जेसीबींवरुन पुष्पवृष्टी, हजारो कार्यकर्ते व शेकडो गाड्यांचा ताफा
सातारा,(प्रतिनिधी): फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या निनादात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर विविध मान्यवरांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली.
विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा चौकार लगावणार्या आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळणार, याची त्यांच्या समर्थकांसह राजकीय जाणकारांना खात्री होतीच. माण- खटावसारख्या भागाचा दुष्काळी कलंक पुसून हा भाग सुजलाम-सुफलाम करण्याचे शिवधनुष्य आ. जयकुमार गोरे यांनी लीलया पेलले. विविध योजनांद्वारे या दुष्काळी पट्ट्यांत पाणी आणून त्यांनी इथला शेतकरी समृद्ध केला. त्यामुळे मतदारांकडून ‘जलनायक’ ही उपाधी त्यांनी मिळवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. मंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर, सोमवार, दि. २३ रोजी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळनजिक ना. गोरे यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यावेळी भल्यामोठ्या क्रेनने उचललेल्या २०- २० फुटी पुष्पहारांनी तसेच फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या घोषात त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो गाड्यांच्या ताफ्याने जाणार्या- येणार्या सर्व वाहनधारक, प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते.सारोळा पुलावरुन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विजयी मिरवणूक सातार्याच्या दिशेने निघाली.
दरम्यान ना. गोरे यांनी नायगांव येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन केले. यानंतर शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड, वाढेफाटा याठिकाणी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने भले मोठे पुष्पहार घालण्याबरोबरच जेसीबींमधून पुष्पवृष्टी, फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतषबाजी अशा या स्वागतामुळे मंत्री गोरेही भारावून गेले.
सातारा शहरात पोहोचताच भारतीय जनता पक्षाच्यावतीनेही त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर खास तयार केलेल्या रथामधून त्यांची भू-विकास बँकेकडून पोवई नाका शिवतीर्थापर्यंत मिरवणूक नेण्यात आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर हा ताफा दहिवडीकडे रवाना झाला.