ना. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली खा. उदयनराजेंची भेट

सातारा

जिल्ह्यातील मंत्र्यांच्या हातून जनकल्याणाचे काम व्हावे, अशी अपेक्षा केली व्यक्त

सातारा,(प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री पदे मिळेल मिळाल्यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली आहे. शिवेंद्रसिंहराजेंसह या चौघांचेही हातून जनकल्याणाचे काम व्हावे, या शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना आगामी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसने केवळ घोषणाबाजीपलीकडे काहीच केले नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाचा कार्यभार जाहीर झाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात येऊन प्रथमच खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे सोमवारी भेट घेतली. त्यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शाल घालून विशेष सत्कार केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्ह्याला चार चार मंत्री मिळाले आहेत. या चारही मंत्र्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून जिल्ह्यातील व राज्यातील जास्तीत जास्त लोकांचे कल्याण व्हावे. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या हातून निश्चितच सर्वांचे कल्याण होईल. छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी हा मतदारांनी कौल दिला आहे. जिल्ह्यातील अनेकांना यापूर्वी मंत्रीपदाची संधी मिळाली, पण त्यांनी काहीच केलं नाही. सातारा हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात अशी परिस्थिती का झाली ? काँग्रेस पक्षाने तर केवळ घोषणाच केल्या. आता या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यांच्या प्रगतीसाठी एकत्रित राहूनच सर्वांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले व जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमच्या मंत्रीपदाची मागणी केली होती. त्यानुसार मला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपची मोठी ताकद जिल्ह्यात निर्माण झाली आहे. ती ताकद उदयनराजे यांच्या नेतृत्वातूनच तयार झाली आहे. भाजप जिल्ह्यात खोलवर किती रुजला आहे, हे या निवडणुकांतून दिसून आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व जागा निवडून आल्या. या पार्श्वभूमीवर यापुढे श्री. छ. उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून काम करू. राज्य आणि केंद्र यांचा एकत्र समन्वय साधून जिल्हा विकासाच्या वाटेवर नेऊ, असेही ते म्हणाले.

सायरन वाजवल्याशिवाय जाऊ देणार नाही : खा.उदयनराजे

खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सायरन वाजून जलमंदिरमधून बाहेर पडण्याचा सल्ला देताच तेथे उपस्थितांमध्ये हशा पिकला. सायरन वाजवल्याशिवाय मी त्यांना इथून जाऊ देणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच पालकमंत्रीपदा बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी काहीतरी ठरवलं असेलच. शिवाय ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांना संधी देण्याचा विचार झाल्यास शिवेंद्सिंहराजे यांना पालकमंत्री पद मिळाला हवे. कराडच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी “जिल्ह्याचे मालक उदयनराजे आहेत,” असे सांगितले होते, याची आठवण शिवेंद्रसिंहराजे यांनी करून दिली. त्यावर उदयनराजे म्हणाले “तसे काही नाही. पण थोडेफार कॅप्टनचे ऐकले पाहिजेच. सगळ्यात गोष्टी सांगायच्या नसतात, तर काही समजून घ्यायचे असतात. जो सर्वांना एकत्र घेऊन पुढे जातो त्याला पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले.