चांगल्या लेखनासाठी रियाज महत्त्वाचा : लक्ष्मीकांत देशमुख

सातारा

अनावळे येथे दोन दिवसीय सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

सातारा,(प्रतिनिधी) : बऱ्याचदा लेखक हा जीवनाचा शोध घेताना सुखाची कमी आणि दुःखाची कहाणी जास्त लिहितो. वास्तविक दुःखाला अनेक छटा असतात. त्या लेखकाला मांडता आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी रियाज महत्त्वाचा आहे, असे मत ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

अनावळे (ता. सातारा) येथील ‘श्रीलीला रिसॉर्ट’मध्ये दोन दिवस चाललेल्या या शब्दवेल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कथाकथन, महिला कविसंमेलन, गझल मुशायरा, नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण, कथाकथन, बोलीभाषेतील कविसंमेलन, बालसाहित्य सादरीकरण अशा नानाविध व दर्जेदार सत्रांनी हे साहित्य संमेलन रंगतदार ठरले. रविवारी या संमेलनाचे सूप वाजले. सुप्रसिद्ध लेखक बाळासाहेब लबडे, कार्याध्यक्ष श्रीपती माने, स्वागताध्यक्ष प्रीतम माने, निमंत्रक प्रवीण बोपुलकर, पुष्पराज गावंडे, प्रतिभाताई सराफ, प्रमोद काकडे, अंजलीताई ढमाळ आदींची या संमेलनास प्रमुख उपस्थिती होती.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले की, लेखकाने जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या अनुभवाने लेखन केले पाहिजे. कोणत्याही गोष्टींचे अंधानुकरण करू नये. अन्यथा हौशी लेखक हा शेवटपर्यंत हौशीच राहतो. लेखकाने स्वयंप्रकाशित होऊन स्वतःची वाट ओळखावी. गायकाप्रमाणेच लेखकालाही रियाज आवश्यक आहे. समाजाचे वाचन करताना पाहिजे. वृत्तपत्राचे नियमित वचन केल्याने अनेक घटना- घडामोडी समजतात. त्यातूनच नवनिर्मितीची प्रेरणा लेखकाला मिळू शकते. नवोदित लेखकांसाठी मोबाईलवरील समाजमाध्यमे हे वरदान आहे. रील किंवा तत्सम गोष्टी न बघता युट्युब आणि विकिपीडिया याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. हे नव माध्यम हाताळण्याची कला शिकण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच आपला अनुभव समृद्ध करता येतो.

पुष्पराज गावंडे म्हणाले, साहित्य नेहमी सृजनशील असते आणि लेखकाची भूमिका ही निरीक्षकाची असते. लेखकाने सतत चिकित्सक असले पाहिजे. त्याचं मन संवेदनशील असावं. त्यावरच त्याच्या लिखाणाचा पोत अवलंबून असतो.

अंजलीताई ढमाळ म्हणाल्या, प्रत्येक माणसाला त्याच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. या भावनांना शब्दरूप देण्याचे काम साहित्यिक करत असतो. आज भाषा टिकवण्याचं आव्हान सर्वांपुढे आहे.

बाळासाहेब लबडे यांनी आपल्या भाषणात लेखकाने आपल्या अनुभवांना कलेचे रूप दिले तर दर्जेदार साहित्याची निर्मिती घडते असे मत व्यक्त केले.

संमेलनाचे निमंत्रक आणि सर्जनशील शब्दवेल साहित्य साहित्य संघाचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी प्रस्ताविक केले. माणदेशी कवयित्री कांता भोसले यांच्या स्वागत गीताने संमेलनाला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अभंग सादर केला.

यावेळी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाच्या सातारा विभागाच्या अध्यक्ष अश्विनी कोठावळे, संघाचे प्रसिद्धी प्रमुख विलास पुंडले, नवनाथ माने, प्रवीण सोनोने, प्रीतम माने, आबासाहेब कडू, देवेंद्र इंगळकर, रामदास गायधने, मनीषा शिरटावले तसेच राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने आलेले साहित्यिक उपस्थित होते. सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे पुढील साहित्य संमेलन संतनगरी शेगाव येथे होणार असल्याचे प्रवीण बोपुलकर यांनी जाहीर केले.