सातारा,(प्रतिनिधी) : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेतर्फे दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठया बांधकाम विषयक प्रदर्शनाचा शुभारंभ गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा आज भारतातील सर्वात जास्त मेंबर्स असलेल्या प्रमुख शाखापैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर बिल्डर्स असोसिएसन ऑफ इंडिया सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर ठोके यांनी असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला व ‘रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ या अभिनव उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.
सातारा हे पश्चिम महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर. या शहराची ओळख छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी आणि निवृत्तीनंतर निसर्गरम्य वातावरणात आणि शांतपणे राहण्याचे एक ठिकाण अशीच होती. कृष्णा- कोयनेच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झालेल्या या भूमीने कात टाकत आधुनिकतेची कास धरायला सुरुवात केली. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकांनी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची शाखा साताऱ्यात सन १९८९ मध्ये सुरु केली. आज असोसिएशनचे सातारा सेंटर ३५ व्या वर्षात यशस्वी वाटचाल करीत आहे. सुरुवातीस बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी सोडवणे, सभासदांना बांधकाम विषयक नवीन तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आणि नवीन पध्दती या विषयी माहिती देणे, यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळा यांचे आयोजन करणे असा उपक्रम हाती घेतला जात होता. केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सभासदांनी सुरू केलेली बिल्डर असोसिएशनची सातारा शाखा भारतातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या अग्रेसर शाखांपैकी एक आहे. बांधकाम क्षेत्रातील नवनवीन माहिती आपल्या सदस्यांना व्हावी आणि जगाच्या बरोबरीने त्यांना प्रगतीपथावर राहता यावे, यासाठी सातारा शाखा अनेक उपक्रम राबविते. यामध्ये विविध विषयांवरील टेक्नीकल सेमीनारचे आयोजन, निरनिराळ्या स्टील, सिमेंट आणि अन्य प्रोडक्शन कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देणे, प्रेझेंटेशन्स इत्यादींचा समावेश यामध्ये असतो. याशिवाय बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वैशिष्ठपूर्ण बांधकाम साईटसचा पहाणी दौराही केला जातो. यामधून सभासदांना आधुनिक तंत्राचे ज्ञान प्रत्यक्षात आत्मसात करता येते.
केवळ व्यवसायापुरतेच मर्यादित न राहता आपणही समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या कृतज्ञ जाणिवेतून’बीएआय’ची सातारा शाखा अनेक सामाजिक राबवित असते. अभियंता दिनाचे औचित्य साधून दरवर्षी विशेष मुलांच्या शाळांमध्ये गेली ३३ वर्षे अव्याहतपणे मदत दिली जाते. याबरोचरच शहरातील इंजिनिअरींग कॉलेजमधील वेगवेगळ्या शाखांतील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे भरघोस पारितोषिक देऊन कौतुक करणे, व्यावसायिक क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यशस्वी उद्योजकांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करणे हा उपक्रम आजतागायत अखंडितपणे असोसिएशनतर्फे सुरू आहे.
बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेने सन २००१ मध्ये अहमदाबाद आणि भूज येथील भूकंपग्रस्तांसाठी भरघोस निधी देवून मदतीचा हात पुढे केला. तसेच सामाजिक बांधिलकी त्सुनामी ग्रस्तांना मदत करूनही असोसिएशनने जोपासली. सांगली, कोल्हापूर, चिपळूण या भागात महापुराने थैमान घातले त्यावेळी असोसिएशनने नैसर्गिक अवकृपा झालेल्या त्या भागातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याची योग्य ती मदत पुरवली. याशिवाय कोरोना महामारीच्या अत्यंत बिकट परिस्थितीत नारागरिकांना अन्नधान्याचे वाटप, जंबो कोविड सेंटरच्या स्वच्छतेचे काम, व्हॅक्सीनेशन कॅम्पचे आयोजन, मास्क वापरण्याबद्दलचे सामाजिक भान रुजवण्यासाठी चे मार्गदर्शन अशी विविध सामाजिक कामे केली. शिवाय कामगारांच्या सुरक्षिततेचा विचार करून बांधकाम क्षेत्रातील जोखमीचे काम करणाऱ्या कामगारांना संस्थेतर्फे हेल्मेट पुरवण्यात आली.
सध्या सलग चार दिवस होत असलेल्या “रचना प्रॉपर्टी एक्सपो”च्या माध्यमातून व्यावसायिक प्रगतीबरोबरच ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या गृह प्रकल्पांची माहिती करून देण्याचा प्रयत्न असोसिएशन करीत आहे. दर दोन वर्षातून एकदा साताऱ्यात हे प्रदर्शन होत असते. त्यामुळे सातारकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील गृहखरेदी इच्छुक नागरिकांनी आणि गृह प्रकल्पांबाबत माहिती मिळवण्यासाठी सर्वच नागरिकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी, असे हे महत्त्वाचे प्रदर्शन आहे, अशी माहितीही बिल्डर्स असोसिएशन तर्फे देण्यात आली आहे.