सातारा जिल्ह्यातील कामकाजाचा घेतला आढावा
सातारा,(प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली रस्ते, पूल, शासकीय निवासी, अनिवासी इमारत बांधण्याची कामे सुरु आहेत, ती सर्व कामे वेळेत पूर्ण करा. शासकीय मेडिकल कॉलेजचे काम प्रगतीपथावर असून हे कामही तातडीने पूर्ण झाले पाहिजे. कोणतेही काम असू द्या, प्रत्येक काम हे दर्जेदार झाले पाहिजे याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालावे. बांधकाम विभागाच्या कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत कोणतीच तडजोड करू नये, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
शासकीय विश्रामगृह येथे ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व उप अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध रस्ते, सर्व प्रकारचे पूल बांधणे, पथदिवे बसवणे, हॅम, नाबार्ड व इतर योजनांमधून सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा ना. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला.
बामणोली ते दरे व तापोळा ते अहिर केबल स्टे पूल, आपटी ते तापोळा मोठा पूल बांधणे, सातारा- कोरेगाव रस्त्यावरील माहुली येथील नवीन पूल बांधणे, सिव्हिल हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधणे, सैनिक स्कुल नूतनीकरण, पाटण शासकीय इमारत, वाई शासकीय इमारत बांधकाम आदी सर्व कामाच्या प्रगतीबाबत चर्चा झाली. प्रस्तावित कामे मंजूर करून घ्या आणि मंजूर असलेली कामे सुरु करा, तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केल्या.
मेडिकल कॉलेजचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत ना. शिवेंद्रसिंहराजेंनी समाधान व्यक्त केले. राज्यात समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. स्वच्छतागृह बांधल्यानंतर त्याची स्वच्छता व देखभाल झाली पाहिजे याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, काम घेणारा ठेकेदार कोण आहे हे पाहू नका. ज्याने कोणी काम घेतले असेल त्याच्याकडून संबंधित काम दर्जेदार झालेच पाहिजे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घाला. कामाच्या दर्जाबाबत तडजोड होऊ देऊ नका, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.