देवास अभ्यंग स्नान,पालखी, मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन
सातारा,(प्रतिनिधी) : येथील रविवार पेठेतील खंडोबाच्या माळावर सालाबाद प्रमाणे श्री खंडेराया जागृत देवस्थानच्या वतीने ऐतिहासिक खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादरूपी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे पावणे दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने भंडाऱ्याच्या आयोजन करण्यात येते. यावर्षी सोमवार, दि. ३० रोजी सोमवती अमावस्येचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्यामध्ये पहाटे साडेसहा वाजता श्रीक्षेत्र संगम माहुली येथे देवांस अभ्यंग स्नान घालण्यात येईल.
त्यानंतर सकाळी साडेसात वाजल्यापासून पोवई नाक्यापासून भव्य पालखी व मिरवणूक सोहळा काढण्यात येईल. त्यानंतर साडे दहा वाजता भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर दुपारी अकरा वाजता पूजा व होम हवनास प्रारंभ होईल. दुपारी साडेअकरा पासून वाघ्या मुरळीचा पारंपारिक कार्यक्रम होणार असून दुपारी एक पासून महाप्रसाद अर्थात भंडाऱ्यास सुरुवात होईल. रात्री आठ वाजता महाआरती होणार असून या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री खंडेराया जागृत देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.