हुल्लडबाजांवर पोलीस कारवाईचा इशारा

सातारा

नववर्ष स्वागतानिमित्त जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

सातारा, (प्रतिनिधी) : नववर्षाच्या स्वागताची जिल्ह्यातील नागरिकांकडून जय्यत तयारी झाली आहे. त्याचप्रमाणे नववर्ष स्वागतानिमित्त जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

सातारा पोलीस दलातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाई, पाचगणी, महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते. कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या दृष्टीने सातारा जिल्हा पोलिसांनी ९७ पोलीस अधिकारी आणि १३०० कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नेमणूक केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी ५०० गृहरक्षक नेमण्यात आले आहेत याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. तसेच मद्यपी वाहन चालकांच्या तपासणीसाठी ३३ ब्रिदिंग अनालायझर यंत्रे तैनात करण्यात आली आहेत.

मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वाई, महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, बामणोली, कास पठार तसेच शिवसागर बॅकवॉटर परिसरातील ग्रामीण भागांमध्ये खाजगी फार्म हाऊस, बंगले, हॉटेल्स येथे मेजवान्यांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिसांनी सुद्धा समाजकंटकांवर नियंत्रण ठेवणे, हुल्लडबाजांवर कारवाई करणेकामी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ९७ पोलीस अधिकारी, १३०३ पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच विशेष बाब म्हणून ५०० गृहरक्षक जवान (होमगार्ड) नेमण्यात आले आहेत. वाहतूक कर्मचाऱ्यांकडे ३३ ब्रीदिंग अनालायझर यंत्रे देण्यात आली आहेत. ज्याद्वारे मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे . गर्दीच्या बाजारपेठा, सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणे तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर बारकाईने बंदोबस्त असून पेट्रोलिंग, कोंबिंग ऑपरेशन तसेच रात्रगस्त, चेक पोस्टवर वाहनांची पडताळणी इत्यादी कारवाया सुरू झाल्या आहेत. याशिवाय डॉल्बी साउंड सिस्टमद्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवरसुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे. महिलांची छेडछाड, गैरकृत्य, अंमली पदार्थांचे सेवन, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी या बाबी प्रतिबंधित असून त्यावर सातारा पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार, तापोळा, बामणोली या पर्यटन स्थळांवर ३१ डिसेंबरच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सुद्धा यवतेश्वर घाट, महाबळेश्वर, कास या परिसरात चेकिंग पॉईंट राहणार असून वाहनांची कसून तपासणी होणार आहे. दरम्यान, नव्या वर्षाचे स्वागत शांततापूर्ण पद्धतीने करावे. कोणीही हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.