अजिंक्यतार्यावरील मंगळाईदेवी मंदिर परिसरात सूर्योदयावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन
सातारा,(प्रतिनिधी) :’हरित सातारा’ ग्रुपच्या पुढाकाराने नववर्षानिमित्त अजिंक्यतारा किल्ल्याच्या मंगळाई टेकडीवर वृक्ष संगोपनाच्या उपक्रमाचा प्रारंभ बुधवार १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समस्त सातारकर यांच्या साक्षीने होणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन हरित सातारा ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
साताऱ्याचे आरोग्यपूर्ण हवामान हा नेहमीच सातारकरांसाठी अभिमानाचा विषय राहिला आहे. तथापी गेल्या काही वर्षात प्रदूषणकारी वाहने, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आदींमुळे साताऱ्याची हवा हवी तेवढी शुद्ध राहिलेले नाही. परिणामी श्वसनाचे विकार फुफ्फुसाचे आजार अशा प्रकारच्या व्याधींमध्ये वाढ होत आहे. महानगरांमध्ये तर अत्यंत विदारक चित्र आहे. सातारकरांनी यातून वेळीच सावध होण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनासारख्या थोड्याशा कृतीची गरज आहे.
नववर्षानिमित्त वेगवेगळे संकल्प सोडले जातात. आपण वृक्ष संगोपन व संरक्षणाचा संकल्प सोडत आहोत. अजिंक्यतारा किल्ल्यावर खालच्या मंगळाईच्या परिसरात मुथा ग्रुपसह विविध संस्था व संघटनांनी वृक्षारोपण केले आहे. उन्हाळ्याच्या पाच महिन्यात या रोपांना पाण्याची गरज जास्त भासते. या रोपांचे संगोपन करण्यासाठी दर शनिवारी लोक सहभागातून श्रमदान करून रोपांना पाणी घालण्यात येणार आहे.याचा प्रारंभ बुधवार १ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता खालच्या मंगळाई मंदिर परिसरात होत आहे.
या उपक्रमात विविध संस्था, संघटना, व्यक्ती समूह यांनी सहभाग नोंदवला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून एक तास आपले श्रमाचे दान या रोपांच्या संगोपनासाठी द्यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.