मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारात हलगर्जीपणा केल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप
सातारा,(प्रतिनिधी) : येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६ वर्षे) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपचार करण्यामध्ये डॉक्टरांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तसेच पेठेतील प्रतिष्ठित नागरिकांनी हॉस्पिटलसमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता पत्रकारांचे फोन टाळून याप्रकरणी मौन धारण केल्याने रुग्णालय व्यवस्थापनाची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२७ डिसेंबर रोजी छातीत दुखत असल्याने उपचार घेण्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये अक्षय नलावडे हा युवक दाखल झाला होता. यावेळी त्याची अँजिओग्राफी करून रिपोर्ट नॉर्मल आल्याचे सांगून देखरेखीखाली दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतल्यानंतर त्यास घरी पाठवण्यात आले. मात्र पुन्हा असह्य वेदना होत असल्याने त्यास आज गुरुवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता त्याचे कुटुंबीय मंगलमूर्ती हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. नातेवाईकांनी “अक्षय यास हार्ट अटॅक आला आहे. कृपया लवकर उपचार सुरू करा, ” अशी विनवणी करूनही तेथे कर्तव्याधीन असणाऱ्या भूषण पाटील यांच्या सहकारी डॉक्टरांनी हलगर्जीपणा करत उपचारास वेळ लावला. त्यामुळे अक्षयची प्रकृती खूपच खालावली. अनेकवेळा सांगूनही संबंधित युवकावर उपचार न करता ताटकळत ठेवले. अक्षरशः हातापाया पडून अक्षयवर तातडीने उपचार करण्याची काकुळतीने विनंती केल्यावर डॉक्टरांनी त्यास टेबलवर घेतले. मात्र पाचच मिनिटात त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तद्नंतर हातात तोंडाशी आलेला व घरातील कमावता मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि उपचारातील अक्षम्य वेळकाढूपणामुळे मृत झाल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या आवारात एकच हंबरडा फोडला.
अक्षयच्या निधनाची बातमी समजताच त्याचे मित्र परिवार व मंगळवार पेठेतील नागरीक, प्रतिष्ठित मंडळी यांनी मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या आवारात गर्दी केली. त्याच्या कुटुंबातील महिलांनी फोडलेल्या हंबरड्यामुळे वातावरण तणावाचे झाले. यावेळी अक्षयच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर तसेच हे हॉस्पिटल चालवणाऱ्या संचालक मंडळांवर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईक सकाळपासून या हॉस्पिटल समोर बसून होते.
या हॉस्पिटलमध्ये यापूर्वीही असे अनेक प्रकार घडल्याचा आरोप करून या हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणीही संबंधित युवकाच्या मित्रमंडळींनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
दरम्यान, हा प्रकार समजताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी परिस्थिती समजून घेत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या घटनेस जबाबदार असलेल्या डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी अक्षयच्या कुटुंबातील मंडळींनी व महिलांनी “हा देवमाणूस नाही. राक्षस आहे. त्याला फाशी द्या. अशी मागणी केली.
दरम्यान, याप्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चव्हाण यांना पत्रकारांनी त्यांची बाजू ऐकण्यासाठी फोन केले, मात्र त्यांनी फोन टाळून मौन धारण केल्याने या प्रकरणी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या हेतूबाबत साशंकता निर्माण होत आहे.