क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक लवकरच उभारणार

खंडाळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नायगावच्या स्मारकासाठी १२५ कोटींच्या निधीची मंजुरी

खंडाळा,(प्रतिनिधी): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी वर्षापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नायगाव (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाईंच्या जन्मभूमीत आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती उत्सवात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी १० एकर जमिनीचे अधिग्रहण करण्याचे निर्देश दिले असून निधीची कमतरता भासू न देण्याची हमी दिली. “स्मारक हे केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न राहता विचारांचेही स्मारक होईल, अशी योजना राबविली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणावर भर

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान अधोरेखित करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांना ३३% आरक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे काम सुरू आहे. लखपतीदीदी योजनेद्वारे पुढील दोन-तीन वर्षांत ५० लाख महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.

”ग्रामविकास मंत्र्यांचे दत्तक गाव नायगाव”

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नायगाव गाव दत्तक घेत असल्याची घोषणा केली. “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मग्रामाचा विकास आराखडा तातडीने मंजूर केला जाईल. स्मारकासाठी शासन १२५ कोटी रुपये मंजूर करणार आहे. हे स्मारक दोन वर्षांत उभे राहील, ज्यामध्ये महिलांसाठी विविध प्रशिक्षण व उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.

स्मारकाचे काम प्रगतीपथावर

कार्यक्रमादरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा आराखडा सादर करण्यात आला. याशिवाय शासकीय प्रतिक्षालय, वॉटर एटीएम, महाज्योतीच्या योजनांचे प्रदर्शन आणि महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

अतिथींचे अभिवादन

यावेळी उपस्थित मंत्र्यांनी फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव केला. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार नायगाव येथील कार्यक्रमातच वितरित करण्यात यावा, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी केली.

कार्यक्रमास मंत्री, आमदार, अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायगाव हे भविष्यात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.