मैत्रेयी जमदाडे हिने ‘महाज्योती’च्या माध्यमातून मिळवलेले यश राज्यासाठी प्रेरणादायी : ना.फडणवीस

खंडाळा

सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

खंडाळा, (प्रतिनिधी): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित भव्य उत्सवात ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सावित्रीबाई फुले यांच्या बहुमूल्य कार्याचा जागर करणाऱ्या या उत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ‘महाज्योती’ संस्थेने उभारलेल्या स्टॉलद्वारे संस्थेच्या विविध योजनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

‘महाज्योती’च्या योजनांमुळे यशस्वी वाटचाल

पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे हिने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित ‘महाज्योती’ संस्थेच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेत, कठोर परिश्रम आणि मार्गदर्शनाच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मैत्रेयीने ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) या पदासाठी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून आपले नाव राज्याच्या यशस्वी उमेदवारांमध्ये कोरले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

या विशेष सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाज्योतीच्या योजनांचा लाभ घेत मैत्रेयीने साधलेले यश हे स्तुत्य आहे. सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे समाजातील महिलांना पुढे नेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मैत्रेयीसारख्या मुलींचे यश समाजासाठी प्रेरणादायी आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आहेत.

”सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा”

मैत्रेयीने तिच्या यशामागे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे श्रेय दिले आहे. तिने ‘महाज्योती’च्या सहाय्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचा आपल्या अभ्यासक्रमात कसा प्रभावी उपयोग केला याची माहितीही दिली. तिच्या यशामुळे महाराष्ट्रातील महिला आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

सत्कार सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या अशा कार्यकुशल तरुणींना समाजाने साथ दिल्यास त्यांच्या यशस्वी कामगिरीतून समाजाचा विकास साधता येईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम राज्यभरातील तरुणांना ‘महाज्योती’च्या माध्यमातून यशाची संधी मिळवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.