दै. ऐक्यचे गुरुदास अडागळे यांना शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कारांचे वितरण
सातारा,(प्रतिनिधी) : नागठाणे विभाग पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार व पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सोमवार, दि.६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नागठाणे, ता. सातारा येथील नागठाणे कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दै. ऐक्यचे पत्रकार गुरुदास अडागळे यांना शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, ना. महेश शिंदे, माजी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या वर्षी नागठाणे विभाग पत्रकार संघाच्यावतीने संतोष भोसले-पाटील यांना उद्योगरत्न, गुरुदास अडागळे यांना शोध पत्रकारिता, प्रवीण पाटील यांना आरोग्यदूत, मधुआण्णा खुळे यांना समाजसेवा गौरव, जयवंत जाधव यांना शिक्षणरत्न, शहाजी साळुंखे यांना पर्यटनभूषण, शुभम यादव यांना युवा कृषिरत्न आणि जोतिर्लिंग देवस्थान ट्रस्टला अध्यात्म सेवा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
कार्यक्रमात नेमबाजीतील राष्ट्रीय खेळाडू अमेय निकम, ॲड. धनाजी जाधव-पाटील, ॲड. प्रवीण गोरे, सुनील शेडगे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागठाणे विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष धनाजी कणसे, सूर्यकांत पवार,सचिव शंकर कदम व सदस्यांनी केले आहे.