जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीनगरीमध्ये रंगणार साहित्य, संस्कृतीचा मेळा
सातारा, (प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीमध्ये २४वा ग्रंथ महोत्सव दि. १० ते १३ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार राजीव खांडेकर व ज्येष्ठ लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने विविध कला, संस्कृती व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ग्रंथ महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, सहसमन्वयक डॉ. राजेंद्र माने, सुनीता कदम , नंदा जाधव, प्रमोदिनी मंडपे , निवृत्त शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्रल्हाद पारटे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री. चिटणीस पुढे म्हणाले की, शुक्रवार, दि. १० रोजी सकाळी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी पूजनाने ग्रंथ महोत्सवाची सुरुवात होणार आहे. ही ग्रंथदिंडी राजवाडा मैदान ते सातारा जिल्हा परिषद यादरम्यान निघणार आहे. सातारा शहरातील चाळीसहून अधिक शाळा यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर व लेखक, कवी प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत ग्रंथ संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील. दुपारी दोन ते पाच या वेळेत कथाकथन रंगणार असून रवींद्र कोकरे, राजेंद्र कणसे हे यावेळी कथा सांगणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वप्निल कोरे असून दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर आयाम इनामदार, श्राव्य गायकवाड, नारायणी इंगवले, आर्या नाळे, आस्था धनवडे, मैथिली शिंदे, सोनम लवटे, मेघना गावडे, पायल खामकर, प्रज्ञा कुंभार, स्वरांजली धनवडे, तन्वी बाबर हे बाल विद्यार्थी या सत्रात कथा सादर करणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी पाच ते साडे सहा या दरम्यान “तर्कतीर्थांची स्मरणगाथा” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यानं होणार आहे. सायंकाळी सात वाजता ‘स्वर नाद’ निर्मित ‘सप्तसुरांचे इंद्रधनू’ ही हिंदी- मराठी गाण्यांची सुरेल मैफल रंगणार आहे.
शनिवार, दि. ११ रोजी “धमाल गप्पाटप्पा गोष्टी गाणी गोष्टींचे झाड..” हे लेखिका पत्रकार स्वाती राजे यांचा कार्यक्रम होणार आहे. डॉ. दिलीप गरुड हे सुद्धा यावेळी विशेष सादरीकरण करणार आहेत. दुपारी 11 ते अडीच या दरम्यान निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून देवा झिंजाड, अनिल दीक्षित, बंडा जोशी व कांता भोसले हे निमंत्रित कवी असणार आहेत. दुपारी तीन ते पाच या वेळेत “वाढते पर्यटन व ढासळते पर्यावरण..” हा परिसंवाद रंगणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य कार्यवाह डॉ. अविनाश ढाकणे यामध्ये सहभागी होणार आहेत. डॉ. मधुकर बाचुळकर, उमेश झिरपे, आनंद सराफ, संध्या चौगुले यांचा सहभाग असणार आहे. याच दिवशी सायंकाळी सहा ते सात या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या “वळणावरची माणसं..” या पुस्तकातील विविध पात्रांचा अभिवाचनाचा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. डॉ. आदिती काळमेख , वैदेही कुलकर्णी व चंद्रकांत कांबिरे हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
रविवार, दि. १२ रोजी सकाळी साडेआठ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत कादंबरीकार मनोज बोरगावकर यांची प्रकट मुलाखत होईल. संस्कृती प्रकाशनाच्या सुनीता राजेपवार व दीपलक्ष्मी संस्थासमूहाचे प्रमुख शिरीष चिटणीस ही मुलाखत घेणार आहेत. दुपारी चार ते सहा या वेळेत “मराठी अभिजात झाली आता पुढील वाटचाल कशी होणार ?” हा परिसंवाद होणार असून यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा उपायुक्त अंजली ढमाळ, विभागीय अधिस्वीकृत समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, संपादक श्रीकांत कात्रे, दैनिक लोकमतचे दीपक शिंदे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सायंकाळी सात वाजता “चंदेरी दुनियेतील श्वेत पर्व” या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध अभिनेत्री व दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या निर्मात्या श्वेता शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे .संयोजन समितीचे कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे त्यांची मुलाखत घेणार आहेत.
“येथे घडतात वाचक, वक्ते..” हा कार्यक्रम सोमवार, दि.१३ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते एक या वेळेत रंगणार असून पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर व ज्येष्ठ पत्रकार दीपक प्रभावळकर आणि संत साहित्याच्या अभ्यासिका प्राची गडकरी यामध्ये सहभागी होणार आहेत. सायंकाळी सात वाजता “गाणी मनातली..” हा विजय साबळे व सहकारी यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये डॉ. सुनील पटवर्धन, डॉ. लियाकत शेख, वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, ममता नरहरी हे सहभागी होणार आहेत.