प्रजासत्ताक दिनी दिल्लीत भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राची प्रतिष्ठा
सातारा,(प्रतिनिधी): दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राच्या वतीने ‘मधाचे गाव’ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावावर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. देशातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळख मिळालेल्या मांघर गावाच्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे.
ज्या राज्यांच्या चित्ररथांना कर्तव्यपथावरील संचलनात संधी मिळत नाही, त्यांना लाल किल्ला परिसरातील भारत पर्व प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी दिली जाते. यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांघर गावाच्या संकल्पनेवर तयार करण्यात आला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गाव हे मधपालन करणाऱ्यांचे गाव आहे. गावातील प्रत्येक घरामध्ये मध उत्पादनाचा व्यवसाय केला जातो. सातारा जिल्ह्यातील मध उत्पादनात या गावाचा १०% वाटा आहे. गावात मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र, माहिती दालन, मधुबन, आणि मध विक्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. वन विभागाच्या साहाय्याने मधमाशीपूरक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे, ज्यामुळे मध उत्पादनाला चालना मिळाली आहे.
मधाचे गाव निर्माण करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासोबतच खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, आणि संचालक रघुनाथ नारायणकार यांनीही पुढाकार घेतला.
१६ मे २०२२ रोजी मांघरला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून मान्यता मिळाली. या गावाने निर्मलग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, आणि एक गाव एक गणपती पुरस्कार अशा अनेक सन्मानांची मालिका मिळवली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावाच्या या यशाबद्दल मधुसागर मध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड म्हणाले, “मधाचे गाव मांघर यावर आधारित चित्ररथाचा समावेश होणे हे महाबळेश्वर तालुक्यातील मध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.