सातारा पत्रकार संघाच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध

सातारा

अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी भाेईटे, उपाध्यक्षपदी बांबरे, संघटकपदी जगताप, सचिवपदी चेणगे तर खजिनदारपदी वाघमारे

सातारा,(प्रतिनिधी) : सातारा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्षपदी उमेश भांबरे, सचिवपदी गजानन चेणगे, संघटकपदी अजित जगताप, खजिनदारपदी अमित वाघमारे यांच्यासह १३ जणांच्या कार्यकारिणीची लोकशाही मार्गाने निवडणूकीची प्रक्रिया पार पाडून बिनविरोध निवड झाली.

पुणे विभागीय अधिस्‍वीकृती समितीचे अध्यक्ष व जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, संघाचे मावळते अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्‍थितीत नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत मोरे यांनी सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. यामध्ये पत्रकारिता, सामाजिक, सांस्‍कृतीक क्षेत्रातील निधन झालेल्‍या व्‍यक्‍तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्‍यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले.

संस्‍थेच्या सन २०२३-२४ च्या लेखापरीक्षणास मंजुरी देण्यात आली. सुशांत मोरे व ॲड.चंद्रकांत बेबले यांनी सातारा पत्रकार संघाच्या नव्‍या कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्‍ताव मांडला.सातारा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सुरुवातीला पत्रकार संघाचा १० वर्षातील आढावा घेवून केलेल्‍या कामाची सविस्‍तर माहिती दिली.

ते म्‍हणाले, पत्रकार संघाच्या माध्यमातून जे काम करतील त्‍यांनाच पदाधिकारी म्‍हणून यापुढे संधी मिळेल. याउलट जे संघाच्या कामकाजामध्ये खोडा घालतील, त्‍यांच्यासोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हरीष पाटणे व आम्‍ही मिळून सर्व संपादकांना सोबत घेत भविष्यातही संघटनेचे नेतृत्‍व करत राहू. नव्‍या सहकार्‍यांना जिथे शक्‍य आहे तिथे संधी देत राहू. यावेळी विनोद कुलकर्णी यांनी सातारा पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर केली. उपस्‍थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात कार्यकारिणीस मान्‍यता दिली.

संघाच्या बिनविरोध पदाधिकारी निवडीमध्ये अध्यक्ष म्‍हणून विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यपदी उमेश भांबरे, सचिवपदी गजानन चेणगे, संघटकपदी अजित जगताप, खजिनदारपदी अमित वाघमारे, कार्यकारिणीच्या सदस्‍यपदी चंद्रकांत देवरुखकर, अरुण जावळे, मनोज पवार, सचिन काकडे, रिझवान सय्यद, मीना शिंदे, गौरी आवळे यांची नावे जाहीर करण्यात आली.

हरीष पाटणे म्‍हणाले, सातारच्या पत्रकारितेला मोठी पंरपरा आहे. पत्रकार संघटनेचे जिल्‍ह्यात काम करत असताना बहुतांशी पत्रकारांच्या मदतीला धावून जाता आले याचा अभिमान आहे. जिल्‍हा पत्रकार संघाच्या माध्यमातून केलेले काम संपूर्ण जिल्‍ह्यासमोर आहे. अधिस्‍वीकृती समितीच्या माध्यमातून राज्यात सर्वाधिक पुणे विभागात पत्रकारांना अधिस्‍वीकृती दिली गेली आहे. पत्रकारांच्या हितासाठी भविष्यातही चांगले निर्णय घेवू. यानंतर डिजीटल मिडीया परिषद व सातारा जिल्‍हा पत्रकार संघासाठीही नव्‍याने सभासद नोंदणी करुन निवडणूकीचा कार्यक्रम लावण्यात येणार आहे. ६ जानेवारीचा पहिला पत्रकार दिन नव्‍या पत्रकार भवनात होईल. त्‍या दिवसापासून पत्रकारांचे उपक्रम पत्रकार भवनातच होतील, असेही पाटणे यांनी जाहीर केले.सातारा पत्रकार संघाच्या नव्‍या कार्यकारिणीने सातारा शहरातील पत्रकारांच्या हिताचे उपक्रम राबवावेत. त्‍याला आमचे सहकार्य असेल, असेही पाटणे म्‍हणाले.

नूतन अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे म्‍हणाले, सातारच्या पत्रकारितेमध्ये हरीष पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी मानदंड निर्माण केला आहे. तोच कित्ता भविष्यात गिरवला जाईल. सर्वांना सोबत घेवून आम्‍ही काम करु. आगामी काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवू. गौरी आवळे यांनी आभार मानले.

यावेळी पुणे विभागीय अधिस्‍वीकृती समितीचे सदस्‍य चंद्रसेन जाधव, मराठी परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्‍हाण, राजेश सोळसकर, दीपक शिंदे, पत्रकार हल्‍ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहूल तपासे, डिजीटल मिडीयाचे राज्याचे कार्याध्यक्ष सनी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, शरद महाजनी यांच्यासह सातारा शहरातील सभासद बहुसंख्येने उपस्‍थित होते.

सातारा पत्रकार संघाच्या नव्‍या कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्‍त एस.एम.देशमुख, विश्वस्‍त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्यासह परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी व सातारा जिल्‍ह्याच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

आदर्श पत्रकारांचा होणार सन्‍मान…

सातार्‍यातील ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी त्‍यांच्या आई-वडीलांच्या नावाने आदर्श पत्रकारांना पुरस्‍कार देण्याची घोषणा केली. सन्‍मानचिन्‍ह व रोख रक्कम असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. सामजिक प्रश्न तळमळीने मांडणार्‍या पत्रकारांचा गौरव व्‍हावा, या उद्देशाने हे पुरस्‍कार देणार असल्‍याचे श्री. महाजनी यांनी सांगितले.