अनंत इंग्लिश स्कूलमधून विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती
सातारा, (प्रतिनिधी):पर्यावरण संवर्धनासाठी साताऱ्यातील हरित सातारा संस्थेने प्लास्टिक निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. अनंत इंग्लिश स्कूलमध्ये या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला, जिथे इयत्ता पाचवी ते आठवीच्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्तीच्या मोहिमेत सहभाग घेतला.
प्लास्टिक पिशव्या उघड्यावर टाकल्यामुळे गुरांच्या मृत्यूपासून मानवी आरोग्याला धोका आणि पर्यावरणाच्या हानीपर्यंत अनेक गंभीर परिणाम जाणवतात. खाद्य पदार्थांसोबत प्लास्टिक गायीगुरांच्या पोटात जात असल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. कचरा जाळल्यामुळे प्लास्टिकचा विषारी धूर वातावरण दूषित करतो, तर जमिनीत गाडले गेलेले प्लास्टिक न कुजल्याने पाण्याचे स्रोत दूषित होतात आणि जमिनीनाही नापीक बनवते.
घराघरात साठणाऱ्या प्लास्टिकचे पुनर्वापर सुनिश्चित करण्यासाठी हरित साताऱ्याने विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती सुरू केली आहे. घरातील प्लास्टिक पिशव्या हरित साताऱ्याने दिलेल्या हुकमध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेले प्लास्टिक सागर मित्र अभियानाच्या माध्यमातून रिसायकल प्रक्रियेसाठी पाठवले जात आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभी प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर आधारित पथनाट्य अमित परिहार यांच्या नाटक समूहाने सादर केले. विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिकविरहित जीवनशैलीचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
शहरातील प्रमुख शाळांमधील विद्यार्थ्यांद्वारे हजारो कुटुंबांपर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा कमी वापर, पुनर्वापर, आणि रिसायकल याबाबत जागरूकता पोहोचवण्याचे उद्दिष्ट हरित साताऱ्याचे आहे. “विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबांवर सकारात्मक परिणाम होईल आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल उचलले जाईल,” असे हरित साताऱ्याचे सदस्य सुधीर विसापुरे यांनी सांगितले.
कार्यक्रमास अनंत इंग्लिश स्कूलचे शालाप्रमुख एस.एस. गायकवाड, उप शालाप्रमुख ए.एस. शिंदे, जे.डी. देवकर, शिक्षकवृंद, हरित साताऱ्याचे प्रकाश खटावकर, उमेश खंडूजोडे, शैलेंद्र पाटील, अमोल कोडक, आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक दीक्षित उपस्थित होते.