मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धांचा महत्त्वाचा वाटा : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

सातारा

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन

सातारा,(प्रतिनिधी) : मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. अशा स्पर्धांमुळे त्यांच्यात सांघिक भावना वाढीस लागते आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.

येथील मुला-मुलींच्या निरीक्षण गृह/बालगृहात आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उद्घाटन नागराजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आनंदा खंडागळे, बालगृहाचे सचिव प्रदीप सांबळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर, पत्रकार शरद काटकर, संरक्षण अधिकारी अजय सपकाळ, तसेच बाल न्याय मंडळाच्या सदस्या स्मिता जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, “समाजात मोठे होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरीक्षण गृहातील मुलामुलींचे भवितव्य घडवण्यासाठी या उपक्रमाचा मोठा उपयोग होईल. क्रीडा स्पर्धांमुळे मुलांना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि सांघिक भावना जोपासण्याची संधी मिळते. स्पर्धांमध्ये विजय-पराजय होत असतो, परंतु त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत राज्यातील विविध बालगृहांमध्ये दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी आणि विधी संघर्षग्रस्त मुला-मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. मुलांना शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा आणि 18 वर्षांनंतर पुनर्वसन यासारख्या मूलभूत गरजा विभागामार्फत पूर्ण केल्या जातात.

यावेळी बालगृहाचे सचिव प्रदीप सांबळे म्हणाले, “चाचा नेहरू बालमहोत्सव हा उपक्रम मुलांसाठी आनंददायी अनुभव ठरतो. या महोत्सवामुळे त्यांना एका वेगळ्या वातावरणाचा अनुभव घेता येतो.

महोत्सवाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, 100 मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळीफेक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलामुलींनी या स्पर्धांमध्ये कौशल्य पणाला लावून सहभाग घ्यावा, असे आवाहन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय सपकाळ यांनी मानले.

कार्यक्रमाला महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका तसेच सातारा जिल्ह्यातील विविध निरीक्षण गृहातील मुले-मुली उपस्थित होते.