सातारा ग्रंथमहोत्सवात अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदे यांची प्रदीप कांबळे, प्रताप गंगावणे यांनी घेतली प्रकट मुलाखत
सातारा,(प्रतिनिधी) : सातारा ग्रंथ महोत्सवाने सलग दोन तप वाचन संस्कृती रुजवण्याबरोबरच कला, संस्कृती, साहित्य क्षेत्रात साताऱ्याचे नाव उज्वल करणाऱ्या भूमिपुत्र व भूमीकन्यांना बोलते केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या निर्मात्या तसेच उद्योजिका श्वेता शिंदे यांची प्रकट मुलाखत ‘श्वेतपर्व’ या शीर्षकांतर्गत रंगली. चित्रपट, छोटा पडदा, व्यवसाय आणि कौटुंबिक जडणघडण याविषयी सुप्रसिद्ध मुलाखतकार, कवी, व्याख्याते प्रदीप कांबळे आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी श्वेता शिंदे यांना बोलते केले. मुलाखतकरांच्या प्रश्नांवर व्यक्त होत असतानाच मानपत्र, रेखाचित्र आणि साडी- चोळीच्या सत्कारामुळे सातारची ही माहेरवाशीण खूपच भारावून गेली व नेत्रदिव्यांतून गंगा- जमुना पाझरत भावूकही झाली.
यंदाच्या ग्रंथमहोत्सवात तिसऱ्या दिवशी रविवारच्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर ग्रंथ खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यातच सायंकाळच्या सत्रामध्ये भूमीकन्या श्वेता शिंदे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी प्राचार्य शिवशंकर मेनकुदळे, शिरीष चिटणीस, वि. ना. लांडगे, डॉ. राजेंद्र माने, प्राचार्या प्रमोदिनी मंडपे, अभिनेत्री श्वेता खरात, संतोष पाटील, वनराज कुमकर, रवींद्र झुटींग यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘सातच्या आत घरात’ या कौटुंबिक संस्कारात वाढलेल्या व साचेबद्ध चौकटीत घडलेल्या श्वेता शिंदे यांनी साताऱ्याच्या निर्मला कॉन्व्हेंटमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत काकांच्या घरी राहून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यावेळी सर्वप्रथम ‘गदर’ या हिंदी चित्रपटात मैत्रिणींसोबत झळकल्याचे त्यांनी सांगितले, तसेच नाटक, चित्रपटातील सहभागासाठी आई- वडिलांची परवानगी मिळवताना झालेली कौटुंबिक बैठक आणि पडद्यामागील घडामोडींची सविस्तर माहितीही यावेळी बोलताना दिली.
दरम्यान देवमाणूस, लागिर झालं जी या मालिकांच्या कथा, निर्मितीमागची कल्पना आणि प्रस्ताव मांडताना अवघ्या दहा मिनिटात झी मराठीच्या अधिकाऱ्यांनी वेगळ्या विषयांवरील या मालिकांसाठी दिलेल्या परवानगीची माहितीही एका प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता शिंदे यांनी दिली.
व्यक्तिगत जीवनात आपले पती संदीप भन्साळी व आपण विभिन्न स्वभावाचे आहोत. आपण कमालीचे तापट, शिस्तप्रिय तर संदीप सर हे प्रचंड मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते त्यांच्या आईचे पुत्र तर आहेतच पण ते त्यांच्या सासूचाही मुलगा झाले आहेत, अशी आपल्या पतीविषयीची भावना त्यांनी मांडली. अडथळ्याची कारणे न सांगता वेळेबाबत काटेखोरपणा दाखवण्यासह करियर आणि व्यक्तिगत जीवनात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दीपस्तभासम मार्गदर्शन केल्याचेही श्वेता शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
प्रताप गंगावणे यांनी आपल्यासाठी लेखन करावे, असे सुचित करतानाच श्री. गंगावणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे आदींच्या लेखनावर मालिका करण्यात आनंद वाटेल, असेही मुलाखतीदरम्यान श्वेता शिंदे यांनी सांगितले. तसेच स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन आणि त्यांना प्राधान्य देत आपण चित्रीकरण करत असल्याचे आवर्जून सांगितले. संतोष पाटील व अन्य प्रमुख सातारकर कलावंतांसाठी आपल्या प्रत्येक मालिकेत खास स्थान असते, असेही त्या म्हणाल्या.
मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी होत असलेले चित्रीकरणाऐवजी साताऱ्याच्या परिसरात चित्रीकरण करून स्थानिक कलाकारांना प्राधान्य देत आणि स्थानिक अर्थकारणाला बळकटी देत भूमीकन्या श्वेता शिंदे यांनी मायभूमीचे पांग फेडले व मालिका चित्रपट यांच्या क्षेत्रात नवीन पायंडा पाडला, याबद्दल आम्हास कौतुक वाटते, असे मुलाखतकार प्रदीप कांबळे यांनी सांगितले. तसेच माहेरच्या सत्काराने भारावून जात भावूक होत डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली, त्यावर ‘माहेरवासीनीचे आनंदाश्रू जमिनीवर सांडल्याने त्यातून समाधानाचे मोती पिकतात’, असे मुलाखतकार प्रदीप कांबळे यांनी यावेळी सांगितले.
‘पारू’ मालिकेतील अनुष्का पात्र साकारणारी श्वेता खरात यांनी मुलाखतीच्या प्रारंभी सत्कारास उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. तसेच श्वेता शिंदे यांच्यामुळे कला क्षेत्रात साताऱ्याचा नावलौकिक वाजल्याचेही आवर्जून सांगितले.
चित्रकार लोहार यांनी काढलेल्या श्वेता शिंदे, श्वेता खरात यांच्या चित्रांचे मान्यवरांनी व सत्कारमूर्तींनी कौतुक केले, तसेच या रेखाटनाबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वनराज कुमकर, श्वेता खरात, महेश सोनावणे आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मुलाखतीनंतर उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे व्यासपीठावर जाऊन श्वेता शिंदे यांच्यासोबत छायाचित्रे घेतली. श्वेता शिंदे यांनीही न कंटाळता चाहत्यांचा आग्रह पूर्ण केला.
माजी सैनिकांनी केला सत्कार
सैनिकांना विवाहासाठी मुलगी देताना वधूपिते बऱ्याचदा नकारात्मक भूमिका घेतात, परंतू “लाख असतील मनमौजी, मात्र लाखात एक माझा फौजी” असे म्हणत “लागिर झालं जी..” या मालिकेद्वारे सैनिकांची जीवनकथा मांडून केलेल्या जनजागृती बद्दल अपशिंगे मिलिटरी गावातील काही माजी सैनिकांनी साडी – चोळी भेट देऊन मुलाखतीच्या प्रारंभी श्वेता शिंदे यांचा सत्कार केला. या सत्काराने त्या भारावून गेल्या. रॅपिड प्रश्नावलीची उत्तरे देताना पतीपेक्षा कन्या आवडते तसेच पुणे मुंबई पेक्षा सातारा आणि मोठ्या पडद्यापेक्षा छोटा पडदा आवडतो, असे श्वेता शिंदे यांनी सांगितले.
कन्या जन्मावेळी प्रचंड वाचन
गर्भारपणामुळे मालिका चित्रपट यांच्या कामातून काही काळ घरी थांबावे लागले, मात्र त्या काळात आपण प्रचंड वाचन केले, मिळेल ती सर्व पुस्तके वाचली. अगदी प्रसुती कळा सुरू झाल्या तरी आपण ‘श्रीमान योगी’सारखी कादंबरी वाचत होते. त्यामुळे आपोआपच आपल्या कन्येवर गर्भसंस्कार झाले. तसेच ग्रंथमहोत्सव आणि पुस्तकांचे वाचन याचे आपले नाते अविस्मरणीय आहे, असे श्वेता शिंदे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.