सातारा- जावली मतदारसंघात शिवेंद्रराजेंचा झंझावाती प्रचार

सातारा

सातारा,(प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली असून सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडत आहे. सातारा- जावली मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून पायाला भिंगरी बांधून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यामुळे त्यांचे कार्यकर्ते फुल चार्ज झाले असून प्रत्येक गाव, वाडी- वस्तीवर शिवेंद्रराजेंच्या प्रचाराचा झंजावात सुरु झाला आहे.

सातारा शहरात दररोज सकाळी शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांची पदयात्रा निघत आहे. याशिवाय सायंकाळी शहरातील विविध भागात शिवेंद्रराजेंच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत कोपरा सभा होत आहेत. यामुळे सातारा शहरात शिवेंद्रराजेंचा झंजावत दिसून येत आहे. पदयात्रेनंतर शिवेंद्रराजे सातारा आणि जावली तालुक्यात गावभेट दौऱ्याद्वारे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक गावात भेट देऊन ग्रामस्थांशी, माता- भगिनींशी संवाद साधत आहे. शिवेंद्रराजेंना सर्वत्र मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.

जावली तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ भागातील छोट्या- छोट्या गावातही शिवेंद्रराजे भेट देत असून मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांनी नुकतीच खोरखिंड (धनगरपेढा), मेरुलिंग या गावांना भेट दिली. आजवर केलेल्या विकासकामांमुळे आणि सततच्या संपर्कामुळे शिवेंद्रराजेंना प्रत्येक गावातील ग्रामस्थांची वैयक्तिक नावासह खडानखडा माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक गावात, वाडी, वस्तीवर शिवेंद्रराजेंचे उत्साहात, जल्लोषात स्वागत केले जात आहे. ग्रामस्थांशी संवाद साधून झालेली विकासकामे आणि पुढे करावयाची कामे याबाबत शिवेंद्रराजे चर्चा करत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार नियोजित विकासकामे मार्गी लावण्याचा शब्द ते देत आहेत. एकंदरच शिवेंद्रराजे म्हणजे आपल्या घरातीलच एक सदस्य आहे, अशी जनभावना असल्याने शिवेंद्रराजेंना मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.