थाटात उद्घाटन, पाच दिवस विविध स्टॉल वरून वस्तूंचे विक्री व भव्य प्रदर्शन
सातारा,(प्रतिनिधी) : ज्योतिर्मय फांउडेशनतर्फे आयोजित ‘ज्योतिर्मय महोत्सव’ म्हणजे सातारकरांसाठी गौरवाची बाब आहे. जिल्ह्यामध्ये २० हजारांहून जास्त महिला बचतगट आहेत. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम हा महोत्सव गेली ११ वर्षे करत आहे. सलग पाच दिवस सुरु राहणार्या या महोत्सवाचा लाभ सातारकरांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘ज्योतिर्मय महोत्सव -२०२४’च्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, पृथ्वीराज पाटील, काका पाटील, अॅड. भरत पाटील, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, माजी नगरसेविका सविताताई फाळके, उमेश पाटील, कार्यकारिणी सदस्या राजश्री दोशी, दीप्ती पवार, सईदा नदाफ, अॅड.अंजुम मणेर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष निर्मला पाटील, सविता पवार, जिल्हा सरचिटणीस वैष्णवी कदम, नंदा इंगवले, बेटी बचाओ अभियानाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी हुबळीकर, मल्लिका पुजारी, रेणुका शेटे, राधिका पाटील, स्मिता शिंगटे, भाजप शहराध्यक्ष रिना भणगे, शहर चिटणीस वैशाली टंकसाळे, उपाध्यक्ष उज्वला खंदारे, सीमा भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्योतिर्मय महोत्सवामध्ये विविध व्यावसायिकांसह, बचतगट, खाद्यपदार्थ आदींचे एकूण २०० स्टॉल्स लागले आहेत. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक येथील स्टॉलधारक या महोत्सवामध्ये उत्साहाने सहभागी झाले आहेत.पहिल्याच दिवशी महोत्सव पाहण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. विविध वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी करुन सातारकर खरेदी करताना पहायला मिळत होते. यावेळी याशनी नागराजन यांनी स्टॉल्सची पाहणी देखील केली.एकाच प्रदर्शनात ऑटोमोबाईल, कृषी, हॅण्डीक्राफ्ट, होम अप्लायंसेस, बचतगट व फूड स्टॉल्सची मोठी रेलचेल पहायला मिळत आहेत.
दरम्यान, शुक्रवार दि. ६ ते मंगळवार, दि. १० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार्या या महोत्सवामध्ये येणार्या ग्राहकांसाठी मराठी व हिंदी नवीन जुन्या गाण्यांचा कार्यक्रम, महिलांसाठी होम मिनिस्टर, लावणी, महिला व युवती यांच्यासाठी फॅशन शो, सरगम द फ्युजन बँड संगीत कार्यक्रम आयोजित केले असून याचा लाभ सातारकरांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
एकंदरीत यांत्रिक पाळणे, कपडे, होम आपलायन्सेस, सौंदर्य प्रसाधने व फूड स्टॉलची रेलचेल असल्याने जिल्हा परिषद मैदानाला जणू काही यात्रेचेच स्वरूप आले आहे.