‘भाजयुमो’चे जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे मागणी
सातारा,(प्रतिनिधी): कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण जाधव मद्यधुंद स्थितीत आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तळीराम डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. करपे यांना लेखी स्वरूपात दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी अरुण जाधव हे बुधवारी सायंकाळी “ऑन ड्युटी” असताना मद्यधुंद स्थितीत प्रसुती विभागात पहुडल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांच्याकडून असे प्रकार घडले आहेत व त्यांच्यावर तक्रारीही दाखल झाले आहेत. मात्र तरीही त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा झाली नाही.
वास्तविक पिंपोडे परिसरातील २० ते २५ गावातील नागरिक परिस्थिती नसल्याने उपचारासाठी म्हणून पिंपोडेच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात येत असतात. मात्र संबंधित रुग्णांवर योग्य ते उपचार करण्याऐवजी अंमलाखाली असलेल्या डॉक्टरांच्या मर्कटलीला रुग्णांना पहाव्या लागतात. मद्यपान करूनच डॉक्टर जाधव हे रुग्णांवर उपचार करतात तसेच गर्भवती महिलांच्या प्रसूतीवेळीही ते नशापान केलेल्या अवस्थेतच असतात. त्यामुळे पिंपोडेच्या शासकीय रुग्णालयात जीव मुठीत घेऊनच रुग्ण येत असतात. केवळ परिस्थिती अभावी शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी वेळोवेळी मागणी करूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, असा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.
दरम्यान बुधवारी रात्री मद्यधुंद स्थितीत आढळल्यावर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल झाल्याने डॉ. अरुण जाधववर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे अमोल कांबळे यांनी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक श्री. करपे यांना निवेदन देताना श्री. कांबळे यांच्यासमवेत युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत निकम, रोहित किर्दत, अक्षय चांगण आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.