म्हसवडलगत नागोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ

माण

बुधवारी कुस्त्या, गुरुवारी बैलगाडी शर्यत : जातिवंत खिलार जनावरांची मोठी आवक

म्हसवड, (रोहन बनगर यांजकडून ) : पश्चिम महाराष्ट्रात जातीवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील श्री नागोबा देवाची यात्रा सोमवार (ता.१६ डिसेंबर ) पासून सुरु होत आहे. यात्रेत शेतकरी जातिवंत खिलार जनावरांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर घेऊन येत आहेत. यावर्षीही यात्रेतील सर्व कार्यक्रम उत्साहात होणार असल्याचे ट्रस्टमार्फत सांगण्यात आले आहे.

म्हसवड पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील माळरानात धनगर समाजाचे दैवत बिरोबा देवस्थानाचे पुरातन मंदिर आहे. याच मंदिर परिसरात धनगर समाजातील नागोबा हा मेंढर रक्षक भक्त होता. त्याने या देवस्थानची आजीवन सेवा केली. मंदिरालगत त्यांची समाधीही बांधण्यात आली. त्यानंतर हे मंदिर श्री नागोबाच्या नावाने परिचित झाले,अशी आख्यायिका सांगितली जाते. या देवस्थानचा मंदिर परिसर प्रशस्त असून वर्षभर विविध धार्मिक उपक्रम होतात. विशेष बाब म्हणजे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात या देवस्थानच्या चाकरीस महिनाभराच्या कालावधीत ४०० ते ५०० भक्त मंदिरात मुक्कामी राहतात.

जातिवंत खिलार जनावरे खरेदीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह नगर, बीड, उस्मानाबादसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतूनही शेतकरी व व्यापारी खरेदीसाठी हजेरी लावतात. नागोबा देवस्थान ट्रस्ट, म्हसवड नगरपरिषद व माण कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रेतील भाविक व जनावरांना सुविधा पुरविल्या जातात. यात्रा कालावधीत “श्रीं “च्या पालीखीची मिरवणूक, पारंपारिक धनगरी ओव्या गायनाची स्पर्धा, गजीनृत्य स्पर्धा, आदी कार्यक्रमांसह मेंढराच्या लोकरीची घोंगडी, जेन,अत्याधुनिक यांत्रिक व पारंपारिक कृषी अवजारे, बैलांच्या नक्षीदार झुली, गळ्यातील कंडे, बेगड, शिंगोळ्या, दोरखंड आदी साहित्य व धान्य साठवणूकीच्या कणग्या इत्यादी वस्तू विक्रीची दुकाने मोठ्या संख्येने दाखल होवू लागली आहेत.

आज १६ डिसेंबर रोजी देवाची सासनाची पूजा व आरती करून यात्रेस सुरूवात होत आहे. बुधवार, दि.१८ डिसेंबर रोजी नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य निकाली कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात ५५ हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती लालासाहेब राजाराम विरकर शेठ, मसाईवाडी (जयपूर शेठ)यांच्या मार्फत तर द्वितीय क्रमांकांची ५१ हजार रुपयांची कुस्ती सावळा गुलाब विरकर,राघू दाजी विरकर,संजय देवबा विरकर (बेंगलोर)यांच्या वतीने लावण्यात आली आहे. तृतीय क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस नागोबा पेट्रोलियम म्हसवडचे मालक भगवान नामदेव विरकर यांचेकडून, तर चतुर्थ क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस चेअरमन हणमंत ठकाराम विरकर – राखुंडे , विरकरवाडी यांचेकडून तर पाचव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस हरीबा गोविंद विरकर, मसाईवाडी यांचेकडून त्याचबरोबर सहाव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस सिध्दनाथ पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मामूशेठ विरकर यांचेकडून तर सातव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस वेताळ दगडू गलंडे,सोकासन यांचेकडून तर आठव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस मधुकर विरकर शेठ (चिपळूण ) यांच्या मार्फत लावण्यात आली आहेत.

गुरूवार दि‌.१९ डिसेंबर रोजी भव्य ओपन बैलगाड्या शर्यती संपन्न होणार असून त्याची नाव नोंदणी ऑनलाइन १८ डिसेंबर पर्यंत सुरु राहील. शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस १ लाख रुपयांचे नागोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत, द्वितीय क्रमांकाचे ७५ हजार रुपयांचे बक्षीस शांती सुपर मार्केटचे मालक बंडू मोडासे,ढाकणीचे सरपंच शंकर बाबू नरबट, कै.महादेव बापू खांडेकर,श्री सिध्दनाथ कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत, तृतीय क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस माजी नगरसेवक आप्पासाहेब ठकाराम विरकर, बाळू कोंडीबा गलंडे यांच्या मार्फत तर चतुर्थ क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस तानाजी यशवंत विरकर (लाडेवाडी ग्रामस्थ), पाचव्या क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस विराट ज्वेलर्सचे मालक दादासो काशिनाथ सातपुते यांच्या मार्फत, सहाव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस रामचंद्र बाबा विरकर(राखुंडे), सातव्या क्रमांकाचे ७७७७ रुपयांचे बक्षीस नागोबा अर्थमुव्हसचे मालक पांडुरंग हरिबा विरकर (रोडके)आदींनी बक्षिसे लावली आहेत.

बैलगाडी स्पर्धेसाठी १ हजार रुपयांची प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत जातीवंत जनावरांची यात्रा भरणार आहे. शुक्रवार दि.२० डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये नागोबा देवाच्या प्रांगणामध्ये विविध गावांचा गजीनृत्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. या गजीनृत्यामध्ये सातारा, सोलापूर,सांगली जिल्ह्यातील सुमारे ५० गजीनृत्य संघ सहभागी होणार आहेत. तर याच कालावधीत रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवार दि.२० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता यात्रेकरूंसाठी कोल्हापूर ऑर्केस्ट्रा कै.ईश्वरा राजाराम विरकर (भोरे) यांचे स्मरणार्थ युवा नेते विठ्ठल ईश्वरा विरकर यांच्या मार्फत हा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी कै.बाजी नामदेव विरकर यांच्या स्मरणार्थ गिरजाप्पा बाजी विरकर शेठ (नागेश गोल्ड रिफायनरी राजस्थान) यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या महाप्रसादासाठी १ लाख रुपयांची मदत यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यात्रेत १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

नागोबा यात्रेतील कार्यक्रम

१६ डिसेंबर : देवाची सासनाची पूजा व आरती.

१६ डिसेंबर ते १७ डिसेंबर : शेळ्या-मेंढ्यांचा बाजार.

१८ डिसेंबर : निकाली कुस्त्यांचे मैदान.

१९ डिसेंबर: भव्य ओपन बैलगाडी शर्यत.

१८ डिसेंबर ते २१ डिसेंबर : जातीवंत जनावरांची यात्रा.

२० ते २१ डिसेंबर: गजीनृत्य स्पर्धा व रात्री ओव्यांचा कार्यक्रम व कोल्हापूर ऑर्केस्ट्रा.

२१ डिसेंबर : सर्व यात्रेकरूंना ट्रस्ट मार्फत महाप्रसादाचे आयोजन.

२२ डिसेंबर : देवाच्या पाकाळणीने यात्रेची सांगता.